पोलिसही चक्रावले मुंबईतील भिकाऱ्यांची संपत्ती बघुन


मुंबई – पोलिसांसह अनेक जण मुंबईत रेल्वेखाली सापडून मृत्युमुखी पडलेल्या एका भिकाऱ्याची संपत्ती बघून चक्रावून गेले आहेत. ८.७७ लाख रुपयांच्या मुदत ठेवी, बँक खात्यात ९६ हजार रुपयांची बचत, तर बिरादीचंद पन्नारामजी आझाद (वय ८२) असे नाव असलेल्या या भिकाऱ्याच्या झोपडीमध्ये १.७५ लाख रुपयांची सुटी नाणी सापडली आहेत. वाशीतील रेल्वे पोलिसांना ही सर्व मालमत्ता बिरादीचंद आझाद यांच्या कुटुंबियांचा शोध घेताना सापडली.

बिरादीचंद आझाद यांचा मृतदेह गेल्या शुक्रवारी रेल्वे रुळांवर सापडला होता. रेल्वे पोलिसांकडून त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेतला जात होता. राजस्थानमध्ये त्यांचा मुलगा राहतो, अशी माहिती मिळाली आहे. बिरादीचंद आझाद हे हार्बर रेल्वे मार्गावर भिकारी म्हणून लोकांकडून पैसे गोळा करायचे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी करीत गेल्यावर आम्ही बिरादीचंद आझाद यांच्या झोपडीपर्यंत पोहोचलो. त्याचे कोणीही नातेवाईक त्यांच्यासोबत राहात नव्हते, असे त्यांच्या शेजाऱ्यांनी आम्हाला सांगितले. मग आम्ही त्यांच्या झोपडीमध्ये जाऊन तपास केल्यावर ही माहिती समोर आली.

याबाबत मीहिती देताना पोलिस उपनिरीक्षक प्रविण कांबळे यांनी सांगितले की, त्यांच्या झोपडीमध्ये आम्हाला चार मोठे डबे आढळले आहेत. त्या डब्यामध्ये १, २, ५ आणि १० रुपयांची नाणी भरून ठेवली होती. आम्ही शनिवारी दुपारी नाणी मोजायला सुरुवात केली आणि रविवारपर्यंत आम्ही नाणीच मोजत होतो. नाणी मोजल्यावर ते १.७५ लाख रुपये असल्याचे दिसले. झोपडीमध्येच पोलिसांना त्याचे पॅन कार्ड, आधार कार्ड हे सुद्धा सापडले.

Leave a Comment