भाजपच्या वरवंट्याखाली मित्रपक्षांची फरफट!


लढाऊ आणि निश्चयी नेते म्हणून महादेवराव जानकर हे महाराष्ट्रात ओळखले जातात. राष्ट्रीय समाज पक्ष हा पक्ष त्यांनी जवळजवळ एकहाती उभा केला. पाच वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाशी युती करून हा पक्ष सत्तेतही आला. मात्र आता जानकरांना भाजपशी संग नकोसा वाटू लागला असून ही युती तोडण्याचा ते जणू बहाणा शोधत आहेत. याचे कारण म्हणजे भाजपच्या बाजूने होत असलेले मित्रपक्षांचे सपाटीकरण.

भाजपचा विजयरथ देशभरात फिरत आहे आणि या वरवंट्याखाली अन्य पक्ष रगडले जात आहेत. त्याचा त्रास विरोधकांना जेवढा झाला तेवढाच मित्रपक्षांनाही झाला आहे. त्याचीच प्रचिती जानकरांना आली आहे. आज राष्ट्रीय समाज पक्षाचे संपूर्ण राज्यात 98 जिल्हा परिषद सदस्य आहेत. रासप 27 राज्यात पसरला असून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश या चार राज्यात रासपला पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. पक्षाच्या ताकदीचा विचार करूनच भाजपकडे 57 जागांची मागणी केली असल्याचे महादेव जानकर यांनी ऑगस्ट महिन्यात सांगितले होते.

अशा या रासपला भाजपने दौंड व जिंतूर हे मतदार संघ सोडले होते. मात्र या मतदारसंघातील उमेदवारांना भाजपचे एबी फॉर्म दिले गेले. त्यामुळे हे उमेदवार भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवतील हे स्पष्ट झाले आहे. त्यावरून जानकर नाराज झाले. त्यांनी मुंबई येथील पक्ष कार्यालयात प्रमुख पदाधिकार्यांपची तातडीने बैठक बोलावली होती. सदर बैठकीत महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय झाला असल्याचे बोलले जाते. मित्रपक्षांना दिलेल्या जागांवरही आपलेच उमेदवार उभे करून भाजपने विश्वासघात केल्याची प्रतिक्रिया रासपच्या गोटातून उमटत आहे. विशेषतः दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपने राहुल कुल यांना एबी फॉर्म दिल्याने जानकर जास्त खट्टू झाले आहेत. आपल्या पक्षाची ओळख जपण्याबाबत जानकर हे खास आग्रही आहेत. त्यामुळेच 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कपबशी या चिन्हावर निवडणूक लढवली होती. कमळाच्या चिन्हावर न लढल्यामुळे त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला, असे त्यावेळी मोठ्या प्रमाणावर सांगितले गेले होते. त्यांच्या या निग्रहालाच भाजपने खो दिला आहे, त्यामुळे सहकाऱ्यांशी चर्चा करून महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय ते जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वास्तविक दोनच महिन्यांपूर्वी भाजप नेत्यांनी याच रासपवर स्तुतीसुमने उधळली होती. राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत वाढत असून रासप हा वटवृक्ष होण्याच्या मार्गावर आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते. जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीतून बाहेर पडला तर याचा भाजपला मोठा धक्का असेल. त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा पूर्ण प्रयत्न भाजप करेल. परंतु भाजपवर नाराज असलेले ते एकमेव नेते नव्हेत. भाजप-शिवसेना युतीत अन्य पक्षांना सामील करून या दोन्ही पक्षांनी महायुतीची रूप दिले खरे. यात सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती सघटना, रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रासप तसेच विनायक मेटे यांचा शिवसंग्राम या पक्षांचा समावेश आहे. जागावाटपात या पक्षांना भाजपच्या वाट्यातून जागा दिल्या खऱ्या. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीत मित्रपक्षांच्या बहुतेक उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर लढायला भाग पाडण्यात आले आहे. त्यामुळे हे मित्रपक्ष नाराज झाले आहेत.

महायुतीच्या जागावाटपात भाजपला 152 जागा, शिवसेनेला 124 जागा तर मित्रपक्षांना 12 जागा सोडण्यात आल्यात. मात्र या बाराही उमेदवारांचे चिन्ह कमळ हे असेल. आधी रामदास आठवले यांनीही अशा प्रकारे चिन्ह उसने घ्यायला विरोध केला होता. मात्र सध्या राज्यात भाजपाची लाट असल्याने भाजपच्या चिन्हावर लढणे अयोग्य नसल्याची भूमिका त्यांनी आता घेतली आहे. जानकर यांच्या प्रमाणेच आठवले हेही आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकविण्याकरिता गेल्या अनेक वर्षांपासून धडपड करत आहेत. त्यात यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला ‘कॉप्युटर’ हे चिन्ह मिळाले. इतक्या कमी अवधीत हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून येण्याकरिता कमळ आम्ही स्वीकारू, असे त्यांनी म्हटले आहे. सर्व मित्रपक्षांमध्ये रिपाइंच्या वाट्याला सर्वाधिक 6 जागा आल्या आहे, परंतु या सहाही जागांवर कमळ हेच चिन्ह असणार आहे.

तसे पाहायला गेले तर भाजप-सेना युतीने गेल्या 5 वर्षांत मित्रपक्षांना जेवढे राबवून घेता येईल तेवढे राबवले आहे. त्यातही भाजपने किंचित अधिकच. मित्रपक्षांची ही फरफट जागावाटपातही चालू राहिली. ‘महायुती’मध्ये मित्रपक्षांना 18 जागा देण्याची घोषणा आधी करण्यात आली. मात्र त्यांच्या पदरात प्रत्यक्षात केवळ 14 जागा आल्या. त्याही आता इतरांच्या नावावर लढविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. याला म्हणतात कर्म!

Leave a Comment