विजयादशमीला ग्रहण विघ्नसंतोषी लोकांचे

‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा, असे वर्णन दसरा किंवा विजयादशमीच्या सणाचे करण्यात येते. दुष्टांवर सुष्टांचा विजय साजरा करणारा हा सण होय. संपूर्ण भारत देशात वेगवेगळ्या नावाने दसरा सण साजरा केला जातो. मात्र त्यातही म्हैसूरचा दसरा हा जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेला सण होय.

हा कर्नाटकाचा शासकीय सण असून या सणाला कन्नड भाषेत नाड हब्बा म्हणतात. म्हैसूरची अधिष्ठात्री देवता असलेल्या चामुंडेश्वयरी देवीने महिषासुर या दैत्याचा या दिवशी वध केला. अशा प्रकारे सुष्टांनी दुष्टांवर विजय मिळवला आणि म्हणूनच या दिवसाला ‘विजयादशमी’ म्हणतात, अशी एक आख्यायिका आहे. दैत्य महिषासुराच्या नावावरूनच या प्रदेशाला म्हैसूर नाव मिळाले असे लोक मानतात. अशा या दसऱ्याने गेल्या काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. मैसूर ही कर्नाटकची सांस्कृतिक राजधानी आणि तेथे हा वर्षातील सर्वात मोठा सण होय. त्यामुळे त्याला आगळे महत्त्व आहे.

म्हैसूरच्या दसऱ्याची ही प्रथा विजयनगरच्या राजांनी श्रीरंगपट्टण येथे 15 व्या शतकात सुरू केली. वाडियार राजघराण्यातील पहिले राजे वडियार यांनी ही परंपरा चालू ठेवली. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी वाडियार राजघराण्यातील दांपत्य म्हैसूरमधील चामुंडी पर्वतावरील चामुंडी मंदिरात श्री चामुंडेश्ववरी देवीची यथासांग पूजा करीत. तिसऱ्या कृष्णराज वडियार महाराजांच्या काळात 1805 सालापासून म्हैसूरच्या महालात थाटामाटात दसरा साजरा करण्यास सुरूवात झाली. आजही वडियार घराण्याचे वारस दसऱ्याच्या दिवशी खाजगी दरबार भरवून ही प्रथा पाळतात.

अशा या शाही उत्सवाला काही विघ्नसंतोषी लोकांची नजर लागली आहे. पुरोगामीपणाच्या नावाखाली या लोकांनी उच्छाद मांडायला सुरुवात केली आहे. राक्षस असलेला महिषासुर हाच आमचा खरा नायक आहे आणि त्याचा उत्सव आम्ही साजरा करणार, असा हट्ट या लोकांनी धरला आहे. आज ही विषवल्ली म्हैसूरमध्ये फोफावली असली तरी उद्या ती आपल्याकडेही येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नवरात्रीच्या मुख्य उत्सवाला शह देण्यासाठी या मंडळींनी ‘महिष दसरा’ नावाचा एक नवीनच प्रकार सुरु केला आहे. या अंतर्गत मैसूर मधील प्रसिद्ध अशा चामुंडेश्वरी मंदिराजवळ यंदा कार्यक्रम होणार होता. तेथे महिषासुराचा जो पुतळा आहे तेथे हा कार्यक्रम घेण्यात येणार होता. मात्र पोलिसांनी या लोकांना रोखल्यामुळे अनर्थ टळला.

स्वतःला विवेकवादी, पुरोगामी आणि दलित संघटना म्हणून घेणारे काही लोक या उपक्रमाच्या मागे आहेत. त्यात प्रसिद्ध लेखक के. एस. भगवान हे आघाडीवर आहेत. महिषासुर हा राजा होता आणि तो प्रजेच्या कल्याणासाठी काम करत होता. मात्र ब्राह्मणवादी लोकांनी या राजाला राक्षसाचे स्वरूप दिले आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

पोलिसांनी हा प्रकार म्हणून पडला असला तरी अपेक्षेप्रमाणे त्याला राजकीय वळण लागले आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रताप सिंहा यांच्या हस्तक्षेपामुळे हा कार्यक्रम प्रशासनाने होऊ दिला नाही, असा आरोप या उपक्रमाच्या आयोजकांनी केला आहे. तसेच सिंहा यांनी पोलिसांच्या विरोधात असंसदीय शेरेबाजी केली असाही आरोप त्यांनी केला आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि चामराजनगरचे खासदार ध्रुवनारायण यांनी सिंहा यांनी माफी मागावी अशी मागणी केली.

सुदैवाने कर्नाटकातील जनता या उपद्व्यापी मंडळीच्या मागे जाणारी नाही. या ‘महिष दसऱ्या’ला परवानगी देऊ नये, अशी मागणी येथील प्रबुद्ध नागरिकांच्या एका गटाने प्रशासनाकडे केली आहे. प्रज्ञावंत नागरिक वेदिके असे या गटाचे नाव आहे. “चार शतकांहून अधिक काळ दसरा हा नाड हब्बा म्हणून साजरा केला जात आहे. मात्र काही लोक ‘महिष दसरा’ म्हणून तो साजरा करण्यासाठी जोर देत आहेत जे योग्य नाही. ‘महिष दसरा’ या कल्पनेला आमच्या संघटनेचा तीव्र विरोध आहे,” असे या गटाचे उपाध्यक्ष जयसिंह श्रीधर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

म्हैसूर शहराचा महसूल मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर अवलंबून असल्यामुळे या उद्योगातील लोकांनीही महिष दसरा या कल्पनेला विरोध केला आहे. शेकडो वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जात असताना काही लोक महिषासुराच्या नावाखाली सामाजिक अशांतता पसरवत आहेत. यामुळे पर्यटकांमध्ये भीती पसरत असून आम्ही याचा निषेध करतो, असे म्हैसूरच्या हॉटेल चालकांच्या संघटनेने म्हटले आहे.

एकुणात बघता हा सगळा प्रकार सांस्कृतिक कमी आणि राजकीय जास्त वाटतो. मात्र त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत चालला आहे याची पर्वा कोणीही करताना दिसत नाही. विजयादशमीला विघ्नसंतोषी लोकांचे ग्रहण लागले आहे ते असे.

Leave a Comment