तिकीट नव्हे, पंख कापले

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील एक वजनदार मंत्री विनोद तावडे यांना अखेर डच्चू मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या सोबतच भाजपचे राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचीही गच्छंती झाली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत या दोघांची नावे घेतली नाहीत तेव्हाच जाणकारांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. मात्र न जाणो दुसऱ्या किंवा तिसऱ्या यादीत त्यांची नावे समाविष्ट करण्यात येतील, त्यांच्या कर्तृत्वाचा आदर ठेवून त्यांचे पत्ते कापण्यात येणार नाहीत अशीही अपेक्षा अनेकांना वाटत होती. परंतु तसे झाले नाही. खडसे यांच्या ऐवजी त्यांची यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तावडे यांना तर तेवढीही सूट देण्यात आली नाही. पाच वर्षे शिक्षणमंत्री म्हणून काम केलेल्या तावडे यांना निवडणुकीच्या राजकारणात चक्क नापास करण्यात आले.

या दोन नेत्यांसोबत ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे आणि प्रकाश मेहता या दोन मंत्र्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यातील बावनकुळे आणि मेहता यांचा अपवाद वगळला तर तिकीट नाकारण्यात आलेले सर्व नेते भाजप नेतृत्वाच्या स्पर्धेत होते, हा योगायोग नक्कीच नाही. यातील तावडे यांनी 2014 मध्ये भाजप सरकार सत्तेवर आले असतानाच आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे स्पष्ट केले होते. आपली महत्त्वाकांक्षा त्यांनी अनेकदा जाहीर केली होती.

नाथाभाऊ खडसे हे तर त्यांच्याही एक पाऊल पुढे गेले होते. मुख्यमंत्री बहुजन समाजातील असावा अशी लोकांची इच्छा आहे, हे त्यांचे वक्तव्य राजकीय वर्तुळात आजही अनेकांच्या लक्षात आहे. अशाप्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जातच त्यांनी काढली होती. त्यानंतरही सातत्याने आपण मुख्यमंत्री होण्यास सर्वाधिक पात्र आहोत, अनुभवाच्या आधारावर हे पद आपल्याकडे यायला हवे, हे त्यांनी वारंवार दाखवून दिले होते.

मात्र दैवयोगाने फडणवीस यांनी पक्ष म्हणून भाजपवर आणि त्यानंतर सरकारवर मांड पक्की केली. आपले एकहाती नेतृत्व त्यांनी प्रस्थापित केले. एक भीषण योगायोग म्हणजे तावडे आणि खडसे हे दोघेही निरनिराळ्या वादात सापडले. तावडे यांच्या बनावट पदवीचे प्रकरण अनेक दिवस गाजले, तर जमीन बळकावल्याचा आरोप खडसे यांच्यावर लागला. त्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला. मुख्यमंत्रिपदाच्या आणखी एक दावेदार पंकजा मुंडे-पालवे यांच्याही विरोधात नेमके चिक्की गैरव्यवहार प्रकरण समोर आले आणि त्याही नंतर शांत झाल्या. मुख्यमंत्रीपदाची आस बाळगलेले चंद्रकांत पाटील यांना आपला मतदार संघ सोडावा लागला आणि कोथरूडमध्ये निर्वासित उमेदवार म्हणून आता ते मते मागत आहेत.

भाजपने मात्र अर्थातच या सर्वांना जाणून बुजून संपविण्यात येत असल्याचे नाकारले आहे. तावडे आणि बावनकुळे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने खुलासा केला. तावडे व बावनकुळे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यांची तिकीटे कापली असे म्हणणे अयोग्य होईल. पक्षाने फक्त या नेत्यांच्या जबाबदारीत बदल केला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यावर काही भाबड्या लोकांचा अपवाद वगळता कोणीही विश्वास ठेवणार नाही.

तावडे काय किंवा खडसे काय – या नेत्यांनी स्वतःच्या हाताने आपल्या कारकीर्दीवर धोंडा पाडून घेतला यात काही वाद नाही. भाजपच्या दृष्टीने दुर्मिळ असलेली सत्ता जेव्हा हाती आली तेव्हा ती राबवण्यात हे नेते कमी पडले. त्यांनी काँग्रेसच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला. त्या सापळ्यात ते अडकले. परंतु हे सगळे केवळ योगायोगाने घडले किंवा आपसूक घडले हे म्हणणे अत्यंत भोळसपटणाचे होईल. फडणवीस यांनी अत्यंत शिताफीने आपल्या एक एक प्रतिस्पर्ध्याला पद्धतशीरपणे कोंडीत पकडले, हे उघड गुपित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी याच पद्धतीने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना एकेक करून संपवले होते. शंकरसिंह वाघेला किंवा केशुभाई पटेल या सारख्या नेत्यांना त्यांनी अडगळीत ढकलले. फडणवीस हे मोदी यांचे प्रिय शिष्य मानले जातात. त्यामुळे आपल्या गुरुंचा कित्ता फडणवीस गिरवत असले तर त्यात काही नवल नाही.

अर्थात राजकारणात एकमेकांवर कुरघोडी चालू शकतात. त्याबद्दल कोणाची बाजू घेणे किंवा कोणाला दोष देणे योग्य होणार नाही. जे आज सुपात असतात ते उद्या जात्यात असतात. आज फडणवीस वरचढ आहेत, त्यामुळे आपल्याला धोका ठरू शकणाऱ्या नेत्यांना बाजूला सारणे त्यांना महत्त्वाचे वाटते. म्हणूनच या तगड्या नेत्यांची तिकिटे कापून त्यांचा बंदोबस्त करण्यात आला. किंबहुना, त्या नव्हे तर त्यांचे पंख कापण्यात आले आहेत.

Leave a Comment