संजय दिना पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक धक्का बसला आहे. ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधले. यावेळी बोलताना संजय दिना पाटील यांनी शिवसेनेसाठी प्रामाणिकपणे काम करत राहिन. तसेच एका नवीन विचारधारेत आपण प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. तसेच जरी मी शिवसेनेत आलो असलो तरीही मी नेहमीच शरद पवार यांच्यासोबत असणार आहे, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.

संजय दिना पाटील यांचा शिवसेनेला मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात फायदा होण्याची शक्यता आहे. कारण संजय दिना पाटील यांना लोकसभा निवडणुकीदरम्यान मानखुर्दमध्ये जास्त मते मिळाली होती. दरम्यान शिवसेनेकडून विठ्ठल लोकरे यांनी मानखुर्दमधून अर्ज भरला असला तरी रिपाइंकडून गौतम सोनवणे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे.

2009 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या तिकीटावर संजय दिना पाटील यांनी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि 15 व्या लोकसभेत विजय मिळवून खासदार बनले होते. परंतु 2014 मध्ये मोदी लाटेमुळे त्यांचा पराभव झाला आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मनोज कोटक यांच्याकडून ते पराभूत झाले होते.

Leave a Comment