‘या’ नेत्यामुळे प्रचलित झाली आयाराम गयाराम म्हण!


नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यात सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरु असून उमेदवारी अर्ज दोन्ही राज्यात दाखल करून झाले आहेत. यापुढे आता प्रचाराचा धडाका सुरु होईल. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात अनेक नेत्यांनी पक्ष बदलले. भारतीय राजकारणातील ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलने ही पहिली वेळ नाही. पण भाजप आणि शिवसेनेत यंदा झालेले इनकमिंग पाहता अस चित्र याआधी कधीच पाहायला मिळाले नसल्याची चर्चा सुरु झाली. भाजप आणि शिवसेनेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रवेश केला. भाजपने तर वेळोवेळी मेगाभरती केली. आयाराम-गयाराम असे संधी मिळेल तेव्हा पक्ष बदलणाऱ्या अशा नेत्यांना म्हटले जाते. महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात देशाच्या राजकारणात हा शब्द आला तरी कसा…

भल्या भल्या एकनिष्ठ, पक्षनिष्ठ मंडळींनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीआधी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याने अनेकांना धक्का बसला. तर निवडणुका जवळ आल्यानंतर काहींनी पक्ष बदलला आणि तिकीट मिळाले नाही म्हणून पुन्हा स्वगृही देखील परतले. हरियाणाच्या राजकारणातून देशाच्या राजकारणात अशा या आराराम-गयाराम कल्चरची सुरुवात आली. विशेष म्हणजे पक्ष बदलणाऱ्यांसाठी कायदा करण्यात आला तरी देखील त्यात काही फरक पडला नाही.

भारतीय राजकारणात आयाराम-गयाराम हा वाक्यप्रचार 1967मधील हरियाणाच्या राजकारणातील एका घटनेनंतर वापरण्यास सुरुवात झाला. चक्क एका दिवसात 3 पक्षात हरियाणातील हरनपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार गयालाल यांनी प्रवेश केला. हा देशाच्या राजकारणाच्या इतिहासातील एक विक्रमच होता. गयालाल यांचे पुत्र उदयभान होडल मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांनाच 67च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा तिकीट मिळाले.

हरियाणाचे पहिले मुख्यमंत्री भगवत दयाल शर्मा यांचे सरकार पडले आणि याच काळात एका दिवसात हसनपूरचे अपक्ष आमदार गयालाल यांनी 3 पक्ष बदलले. प्रथम गयालाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी युनायटेड फ्रन्टमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा 9 तासाच्या आत ते काँग्रेसमध्ये आले. आता गयालाल एवढ्यावच थांबले नाही तर त्यांनी पुन्हा पक्ष बदलला आणि युनायडेट फ्रन्टमध्ये सहभागी झाले. तेव्हा गया राम, अब आया राम असे वक्तव्य राज्यातील नेते राव बिरेंद्र सिंह यांनी केले होते. तेव्हापासून वारंवार पक्ष बदलणाऱ्या नेत्यांसाठी हा वाक्यप्रचार वापरला जाऊ लागला. गयालाल यांच्या या पक्षबदलामुळे देशाच्या राजकारणाला नवा वाक्यप्रचार मिळाला.

Leave a Comment