कोणालाही हवा नसलेला ‘संजय’


महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जसजशा पुढे सरकत आहेत, तसतसे विविध राजकीय पक्षांतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षात बंडाळी माजलेली असतानाच विरोधी पक्षांतही सर्व काही आलबेल नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पवार घराण्यातील मतभेदांनी बेजार झालेला असतानाच काँग्रेसमधील जुनी गटबाजी उफाळून वर आली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी तिकिट वाटपावरून काँग्रेसमध्ये चांगलीच दुफळी माजली आहे. यापूर्वीही आपल्या वावदूक वक्तव्यांनी पक्षाला खाली पाहायला लावणाऱ्या संजय निरुपम यांनीच पुन्हा काँग्रेसला अडचणीत आणले आहे. आपण सुचविलेल्या व्यक्तीचे नाव तिकिट वाटपात नाही त्यामुळे आपण काँग्रेसच्या प्रचार मोहिमेत सहभागी होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर काँग्रेस पक्ष माझ्याशी ज्या वागत आहे त्यावरून पक्षाला रामराम करण्याचा दिवस दूर नाही, अशी धमकीही त्यांनी दिली आहे.

“पक्षाला माझ्या सेवा आणखी नको आहेत, असे दिसते. मी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत केवळ एक नाव सुचवले होते. हे नावही नाकारण्यात आले आहे, असे ऐकण्यात आले आहे. मी पक्ष नेतृत्वाला कळवल्याप्रमाणे, या परिस्थितीत मी निवडणूक प्रचारात भाग घेणार नाही. हा माझा शेवटचा निर्णय आहे, ” असे निरूपम यांनी ट्विटरवरून म्हटले आहे.

अर्थात आपण कोणा व्यक्तीला उमेदवारी देऊ इच्छित होतो, हे त्यांनी जाहीर केलेले नाही.

पक्षातील अनेक जणांनी तक्रार केल्यामुळे निरूपम यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्च महिन्यात मुंबई काँग्रेस प्रमुखपदावरून काढण्यात आले होते. ते एकतर्फी काम करतात, अशी त्यांच्या विरुद्ध तक्रार होती. निरूपम यांच्या जागी माजी मंत्री मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेसच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर देवरा यांनी राजीनामा दिला होता. सध्या माजी खासदार एकनाथ गायकवाड हे मुंबई काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष आहेत.

मुंबई काँग्रेसला या लाथाळ्या नव्या नाहीत. विशेषतः देवरा आणि निरुपम या गटामध्ये विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. परंतु मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेले संजय निरुपम यांचे नाव नेहमीच या तमाशात पुढे असते. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही लोकसभा निवडणुकीत आपल्या पराभवाला निरुपम हेच जबाबदार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले होते. ते पत्र बाहेर फुटल्याने गेल्या महिन्यात मोठा वाद झाला होता आणि अखेर उर्मिलाने पक्षाचा राजीनामाही दिली होता.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे नेते गोपाळ शेट्टी यांच्याविरुद्ध उर्मिलाने निवडणूक लढवली होती. निवडणुकीनंतर निकाल लागण्यापूर्वीच, किंबहुना एक्झिट पोल जाहीर होण्यापूर्वीच, 16 मे रोजी उर्मिलाने मिलिंद देवरा यांना एक पत्र पाठवून निरुपम यांचे नजीकचे सहकारी संदेश कोंडविलकर आणि भूषण पाटील यांचे प्रचारादरम्यानचे वागणे अयोग्य असल्याचे म्हटले होते. देवरा यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर निरुपम यांनी देवरा यांच्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष टीका केली होती. त्यानंतर लगेचच हे पत्र बाहेर आल्याने त्या वादाला नवे वळण मिळाले.

त्याही पूर्वी भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत त्यांनी असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. या कारवाईचे पुरावे भारत सरकारने जाहीर करावेत अन्यथा अशी कारवाई झालीच नसावी, असे आव्हान त्यांनी दिले होते. उत्तर भारतीयांमुळे मुंबई चालते. त्यांनी जर काम करायच बंद केलं, तर मुंबई बंद पडेल असंही ते एकदा बडबडले होते. आणीबाणीवर आधारित मधुर भांडारकर यांचा ‘इंदू सरकार’हा चित्रपट काँग्रेसला अडचणीचा वाटत होता. तेव्हा आपल्याला दाखवल्याखेरीज चित्रपट प्रदíशत करू नये, अशी तंबी याच निरुपम यांनी दिली होती.

त्याही पूर्वी खुद्द पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विषयी वादग्रस्त मजकूर छापल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली होती. काँग्रेस पक्षाच्या मुखपत्राचे निरुपम हे संपादक असताना त्यात हा वादग्रस्त मजकूर छापून आला होता.

विशेष म्हणजे या निरुपम यांची कारकीर्द मराठी माणसासाठी लढणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेतून सुरू झाली. सुरुवातीच्या काळात संजय निरुपम शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या हिंदी भाषेतील ‘दोपहर का सामना’ या वृत्तपत्राचे संपादक होते. राज्यसभेवर पहिल्यांदा ते शिवसेनेकडून तर दुसऱ्यांदा काँग्रेसकडून निवडून गेले. त्यानंतर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून २००९ साली खासदार म्हणून निवडून गेले.

अशा या रंगतदार माणसाने इतके रंगढंग उधळले आहेत, की कुठल्याही पक्षाला ते नको झाले आहेत. त्यांच्या ताज्या त्राग्यातून हेच वास्तव समोर येत आहे.

Leave a Comment