बिहारमध्ये सास-बहूचा रिअॅलिटी शो


घरोघरी मातीच्या चुली किंवा भांड्याला भांडे लागले की आवाज होणारच, अशा किती तरी म्हणी भारतीय समाजाचे खरे प्रतिबिंब व्यक्त करतात. प्रत्येक घरात काही ना काही कुरबुरी असतातच आणि हे घर जर प्रसिद्ध व्यक्तीचे किंवा राजकारण्याचे असेल तर विचारायलाच नको. अशा वेळेस माध्यमांना आयतेच खाद्य मिळते. सध्या बिहारमधील राजकीय वातावरणात असाच एक वाद पाहायला मिळत आहे. या वादातून जे नाट्य निर्माण झाले त्यामुळे एक आगळा रिअॅलिटी शो उभा राहिला आहे.

तसे पाहायला गेले, तर बिहार राज्यात सध्या प्रचंड पावसामुळे हाहाकार उडाला आहे. निसर्गाच्या प्रकोपासमोर जनता हतबल झाली आहे. प्रत्यक्ष राज्याचे उप मुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन दलाच्या जवानांनी पुरातून सोडवले. लोकांच्या दृष्टीने जीवन-मरणाचा हा लढा सुरू असतानाच राज्याच्या ‘प्रथम परिवारात’ धुमशान सुरू आहे. एक प्रकारे ‘सास भी कभी बहु थी’ या मालिकेची प्रत्यक्ष आवृत्तीच साकार होत आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव हे चारा गैरव्यवहारात तुरुंगात आहेत. त्यांच्या पक्षाची अर्धी-अधिक रया तेव्हाच गेली होती. राहिली साहिली प्रतिष्ठा त्यांच्या अनुपस्थितीत घरात सुरू असलेल्या या गोंधळाने हरण केली आहे. लालूप्रसादांच्या पत्नी राबडी देवी, मुलगी व राज्यसभा खासदार मीसा यादव तसेच यादव परिवारातील दोन पुत्र तेजप्रताप अने तेजस्वी यादव यांच्यात हा कौटुंबिक कलह सुरू आहे. येणारा प्रत्येक दिवस हा कलह आणखी वाढवणारा ठरत आहे. यापूर्वी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या घरात मेनका गांधी आणि सोनिया गांधी यांच्यातील कलह असाच गाजला होता. मेनका यांच्या इंदिरा गांधींच्या विरोधात जाहीर टीका करून खळबळ माजवली होती. बिहारच्या शेजारच्या उत्तर प्रदेशात असाच सत्ताधारी पक्षात बेबनाव झाला होता. तिथे पिता-पुत्रच समोरासमोर उभे टाकले होते.

मात्र यादव कुटुंबात जे घडत आहे ते आतापर्यंतच्या पाच-सहा पावले पुढेच आहे. तेथे एका बाजूला सासू आणि नणंद तर दुसऱ्या बाजूला सून उभी आहे. लालूंचे थोरले चिरंजीव तेजप्रताप यादव यांनी लग्नाच्या सहा महिन्यानंतरच पत्नी ऐश्र्वर्या राय हिला घटस्फोट देण्यासाठी अर्ज केला होता. मात्र ऐश्वर्या या सासरीच राहत होत्या. रविवारी रात्री यादव कुटुंबाच्या या पुत्रवधूने पाटण्यात धरणे दिले. आमदार म्हणून राबडी देवी यांना मिळालेल्या अधिकृत सरकारी निवासस्थानाबाहेर हा प्रसंग सुरू होता. “माझ्या सासू आणि नणंद मीसा भारती यांनी मला घराबाहेर काढले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सासरची मंडळी मला खायला देत नाहीत आणि माझे जेवण माहेराहून येत आहे,” असे त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. हे सगळे नाट्य वाहिन्यांच्या कॅमेऱ्यासमोर सुरू होते, हे विशेष.

मीसा भारती मला शिवीगाळ करतात. माझे व माझ्या पतीचे संबंध सुरळीत होऊ नयेत, यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. तेजप्रताप आणि तेजस्वी यांच्यातही फूट पाडण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत, असे अनेक आरोप त्यांनी केले. ऐश्वर्या यांनी महिला हेल्पलाईनवरही तक्रार केली आणि त्यामुळे पोलिसही राबडी देवींच्या घरी येऊन धडकले.

ऐश्वर्या या बिहारच्या माजी मुख्यमंत्री दरोगाप्रसाद राय यांच्या नात आहेत. त्यांचे वडील चंद्रिका राय हेही राजकारणात आहेत आणि स्वतः ऐश्वर्या या दिल्लीत व्यवस्थापन शास्त्रात पदवी घेतलेल्या आहेत. म्हणजेच आपण काय करत आहोत, याचे पूर्ण भान त्यांना आहे. तेजप्रताप यांच्या म्हणण्यानुसार, ऐश्वर्यासोबतचा त्यांचा वाद हा हनीमूनवरुनच सुरु झाला होता. ऐश्वर्याला हनीमूनसाठी इंडोनेशियाला जायचे होते. पण त्यासाठी नकार दिल्याने हा वाद सुरु झाला. इतकेच नव्हे तर ऐश्वर्याला धुम्रपान आणि मद्यपानाचीही आवड असल्याचा आरोप तेजप्रताप यांनी केला होता.

अर्थात हे राजकीय किंवा कौटुंबिक नाट्य ही यादव कुटुंबाची अंतर्गत बाब म्हणून सोडता येईल. मात्र पुरासारख्या ऐन समस्येच्या काळात जनता कष्टात असताना हा तमाशा मांडणे याला काय म्हणावे? लग्न आणि घटस्फोटासारख्या खासगी बाबींचे धुणे जाहीररीत्या धुण्यामुळे दोन्ही बाजूंची इभ्रतच जाणार, आणखी काही नाही.

Leave a Comment