बंडखोरी नावाचा सर्वच पक्षांचा आजार


राज्य विधानसभेच्या निवडणूका सध्या चालू आहेत. तसे पहायला गेले तर निवडणुकीचा माहोल तयार झालेला नाही. लढत एकतर्फीच असल्यासारखे दिसते. त्यामुळे निवडणुकीच्या या लढाईत रंगत येणार तरी कशी, अशी शंका येत असतानाच एक नवे वळण मिळाले आहे. तसे हे वळण पूर्णपणे नवीन नाही. गेली काही दशके राजकारण आणि निवडणुका या दोहोंचा तो अविभाज्य भाग बनला आहे. तरीही दरवेळेस या वळणामुळे राजकीय चित्रात नवीन रंग भरले जातात.

राजकारण आणि निवडणुकांचे हे वळण म्हणजे बंडखोरी. सत्ताधारी भारतीय जनता पक्षासोबतच विरोधी पक्षांनाही या बंडखोरीने ग्रासलेले आहे. राजकीय पक्षातील नेते व त्यांचे कार्यकर्ते आपल्याच पक्षाच्या विरोधात उतरले आहेत. आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी काही ठिकाणी त्यांनी वाहिन्यांच्या कॅमेऱ्याचा आश्रय घेतला तर काही ठिकाणी ते चक्क रस्त्यावर उतरले.

पुण्यातील कोथरूड मतदारसंघातील भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचे उदाहरण हे आता राज्यव्यापी चर्चेचा विषय झाली आहे. तेथे त्यांनी चक्क आपल्या प्रदेशाध्यक्षांनाच आव्हान देऊ केले. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून पक्षाने चंद्रकांत पाटील यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, त्याला लक्षणीय प्रमाणात विरोध होत आहे. त्यांच्या विरोधात दूरचा नको, घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे, अशी फलकबाजी करण्यात आली. पाटील हे बाहेरचे उमेदवार असल्याचे चित्र निर्माण करण्यात त्यांच्या विरोधकांना यश आले. स्वतः कुलकर्णी यांनी आपल्याला मनसेप्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे फोन आल्याचे सांगून अप्रत्यक्षरीत्या बंडखोरी करून पाहिली.

अखेर पाटील यांना कार्यकर्ता मेळावा घेऊन तसेच फेसबूकवर व्हिडीओ पोस्ट करून या प्रचाराला उत्तर द्यावे लागले. “मी पुण्याचा, मी महाराष्ट्राचा, मी अवघ्या देशाचा आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे. माझी पत्नी पुण्याची. माझा मेव्हणा आजही धनकवडीत राहतो. मी विद्यार्थी परिषदेत कार्यरत असल्यापासून माझे पुण्याशी नाते जोडलेले आहे, त्यामुळे मी परका नसून पुण्याचाच आहे,” अशा शब्दांत पाटील यांनी आपल्या उमेदवारीचे समर्थन केले.

पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार एकनाथ खडसे हेही बंडखोरांच्या रांगेत सामील झाले. भाजपच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव नसले (आणि दुसर्या् यादीतही ते नव्हते) तरी त्यांनी स्वतः जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला.

पुण्यात विधानसभेच्या आठही जागा भाजपकडे गेल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये निराशेची भावना पसरली आहे. त्यामुळे शिवसैनिक आता बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचे सांगण्यात येते. कसबा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी बंडखोरी करणार असल्याचे जाहीर केले आहे.आमदारकीची एकही जागा लढायची नसेल तर शहरात पक्ष कसा प्रस्थापित होईल? असा प्रश्न विचारत पुण्यातील शिवसेनेचे शहरप्रमुख, नगरसेवक, इच्छुक उमेदवार यांनी मंगळवारी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन आपले गाऱ्हाणे मांडले होते.

काही ठिकाणी तर या बंडखोरीला चक्क हाणामारीचे स्वरूप आले. भोसरी विधानसभा मतदारसंघात बुधवारी आयोजित शिवसेनेच्या बैठकीत हे दृश्य पाहायला मिळाले. शिवसेनेच्या एकूण प्रकृतीला अनुसरून यावेळी पदाधिकाऱ्य़ांमध्ये चांगलाच राडा झाला. जोरदार हमरीतुमरी होऊन त्याचे पर्यवसान झटापटीत झाल्याच्याही बातम्या आल्या. भोसरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. परंतु, महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. पुढील भूमिका ठरविण्यासाठी भोसरीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांची आज भोसरीत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत एक महिला पदाधिकारी आणि एका पदाधिकाऱ्यामध्ये जोरदार वादावादी झाली.

ही बंडखोरी फक्त सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. पुण्यातच कसबा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेसचे इच्छुक रवींद्र धंगेकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला. तसेच मनसे नेत्या रूपाली पाटील यांना तर दोन मतदारसंघातून उमेदवारी अपेक्षित होती. परंतु ती मिळाली नाही म्हणून त्यांनीही निषेधाचा मार्ग पत्करला.

एकुणात चित्र असे निर्माण झाले, की विविध राजकीय पक्षांना निवडणुकीची लढाई विरोधकांशी लढायची नसून स्वपक्षातील बंडखोरांशीच लढायची आहे. त्यासाठी हे पक्ष दुसऱ्याला दोष देऊन शकत नाहीत. एकेकाळी राजकीय पक्षांकडे निष्ठावान कार्यकर्ते असायचे. मात्र युती आणि आघाडीच्या राजकारणात सतता महत्त्वाची, त्यासाठी वाटेल ते केले तरी चालू शकते अशी शिकवण या पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली. त्याचा व्हायचा तो परीणाम झाला. आज हे नेते व कार्यकर्ते फक्त स्वतःपुरते पाहतात. पक्ष किंवा विचारसरणी यांच्याशी त्यांना काही देणेघेणे नाही.

सत्तेचा हा विषाणू राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांमध्ये पसरवला आणि आज याच विषाणूमुळे हे पक्ष आज बंडखोरीमुळे आजारी झाले आहेत.

Leave a Comment