गरिबीमुळे ‘गवत खाण्यास’ मजबूर पाकिस्तानी!


आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानी लोकांना आता एका नव्या मजबूरीचा सामना करावा लागत आहेत. आपला प्रिय मांसाहार सोडून त्यांना आता शाकाहाराकडे वळावे लागत आहे. पाकिस्तान हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचे झपाट्याने शाकाहारी होणारा देश आहे, असा निष्कर्ष एका ताज्या अहवालात नुकताच काढण्यात आला आहे. देशातील वाढत्या चलनवाढीमुळे अनेक पाकिस्तानी व्यक्तींच्या आहाराच्या पद्धती बदलत असून त्यांना मांसाहाराचा त्याग करावा लागत आहे, असे विश्लेषकांचे मत आहे.

जर्मनीच्या डॉयट्शे वेले या वाहिनीने नुकताच या संदर्भात एक वृत्तपट तयार केला आहे. त्यात राजा अयूब नावाच्या एका रेस्टॉरंट मालकाची मुलाखत दाखवण्यात आली आहे. पाकिस्तानात वाढत असलेल्या शाकाहाराबद्दल त्याने चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानमधील बहुतांश लोक अनेक कारणांमुळे शाकाहाराकडे वळत आहेत. मात्र मांसाची वाढती किंमत आणि वाढती दारिद्र्य हे यामागचे मुख्य कारण आहे. त्यामुळे अयुब अस्वस्थ आणि चिंताग्रस्त झाला असून त्याला आपल्या रेस्टॉरंटचा मेनू बदलावा लागला आहे.

“पाकिस्तानी लोकांना काय झाले मला कळेनासे झाले आहे. त्यांच्याकडून मांसाचे सेवन लक्षणीय प्रमाणात घसरले असून ते निचांकी पातळीवर पोचले आहे,” असे अयूब याचे म्हणणे आहे.

युरोमॉनिटर नावाच्या संस्थेने जगभरातील लोकांच्या आहाराच्या सवयीचा अभ्यास केला. त्यात पाकिस्तान हा दुसर्‍या क्रमांकाचा झपाट्याने शाकाहारी होणारा देश असल्याचे संस्थेला आढळले. पाकिस्तानची लोकसंख्या 20 कोटी 80 लाख आहे, त्यातील 11 कोटी 90 लाखांहून अधिक लोक अलीकडच्या काळात शाकाहारी झाले आहेत, खासकरून गेल्या दोन वर्षांत.

पाकिस्तान हा मांसप्रेमी देश म्हणून ओळखला जातो आणि पाकिस्तानी लोक हे सामान्यत: मांसाहारप्रेमी म्हणून ओळखले जातात. कढाई आणि बीफ, कबाब असे तेथील खाद्यपदार्थ जगभरात प्रसिद्ध आहेत. मग त्यांच्यात असा बदल का व्हावा? याचे कारण म्हणजे मागील दशकात पाकिस्तानची आर्थिक स्थिती ढासळत गेली आणि मध्यमवर्गीय व त्याहून खालच्या वर्गातील लोकांना मांस परवडेनासे झाले. याची परिणती अशी झाली, की या लोकांनी मांस खाणे एक तर बंद केले किंवा अगदी बंदच केले. डॉयट्शे वेलेने अनेक लोकांशी संवाद साधला तेव्हा आपण आवड म्हणून नाही तर मांस परवडत नाही म्हणून शाकाहारी झाल्याचे त्यांनी सांगितले.

“आम्ही गेल्या वर्षी महिन्यातून पाच वेळा मांसाहार करत होतो, पण पंतप्रधान इम्रान खान सत्तेत आल्यानंतर आता महिन्यातून एकदा मांस घ्यावे की नाही, याबाबतही आम्हाला विचार करावा लागतो,” असे इस्लामाबादमध्ये कामगार असलेल्या शहनाज बेगम हिने सांगितले. विशेष म्हणजे खान सरकार आल्यापासून इस्लामाबादमध्ये भाजीपाल्यांचे दरही दुप्पट वाढले आहेत, असे तिने सांगितले.

गेल्या एका वर्षात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची किंमत एक तृतीयांशने कमी झाली आहे. त्यामुळे वस्तूंच्या किंमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. “वाढता खर्च आणि महागाई हे हळूहळू लोकांना विशेषतः खालच्या आणि मध्यम-उत्पन्न गटातील लोकांना खाण्या-पिण्याच्या सवयी बदलण्यासाठी भाग पाडत आहेत,” असे आर्थिक विश्लेषक शाहबाज राणा यांचे म्हणणे आहे.

पाकिस्तान पोल्ट्री असोसिएशनच्या अधिका्यांनीही सध्याच्या आर्थिक अडचणी आणि किंमतींच्या वाढीमुळे कोंबड्यांची मागणी कमी झाल्याचे मान्य केले आहे. कोंबड्यासाठीचे बहुतांश खाद्य आयात केले जाते आणि त्यात वाहतुकीचा खर्च यामुळे मांसाची किंमत आणखी वाढते. “पोल्ट्री व्यवसाय तोट्यातच आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून उत्पादन जास्त झाले आहे आणि मागणी खूपच कमी झाली आहे. असे पूर्वी कधीच नव्हते,” असे पाकिस्तान पोल्ट्री असोसिएशनचे उपाध्यक्ष सलीम अख्तर यांचे म्हणणे आहे.

खान यांचे सरकार ऑगस्ट 2018 मध्ये सत्तेवर आले. मात्र सूत्रे हाती घेतल्यापासून खान यांना आर्थिक चणचणीशी तोंड द्यावे लागले आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी खान सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) सहा अब्ज डॉलरचे कर्ज घेतले खरे, मात्र या कर्जाच्या बदल्यात आयएमएफने कठोर उपाययोजना व काटकसरीच्या अटी टाकल्या. त्यामुळे निम्न आणि मध्यमवर्गीय लोकांवर प्रचंड आर्थिक ताण आला आहे. येत्या काही महिन्यांत 10 लाखांहून अधिक लोक नोकर्‍या गमावतील किंवा व्यवसाय सोडून जातील 8० लाखांपेक्षा जास्त लोक दारिद्र्य रेषेच्या खाली फेकले जातील, असा अंदाज कराची विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक असगर अली यांनी व्यक्त केला आहे.

या सर्वाचा परिणाम असा झाला,की पाकिस्तानी लोकांना आपला प्रिय आहार सोडावा लागत आहे. घासफूस म्हणजे गवत म्हणून ज्याची आतापर्यंत हेटाळणी केली, तेच खाण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.

Leave a Comment