‘मरजावां’चे पहिले वहिले गाणे रिलीज


काहीच दिवसांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांच्या ‘मरजावां’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. २२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री तारा सुतारिया यांची रोमॅन्टिक केमेस्ट्री या गाण्यात पाहायला मिळते.

‘स्टुडंड ऑफ द ईयर २’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री तारा सुतारियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर आता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती ‘मरजावां’ चित्रपटात झळकणार आहे. तिची या चित्रपटाच्या ‘तुम ही आना’ या पहिल्याच गाण्यात सिद्धार्थसोबतची रोमॅन्टिक ट्युनिंग पाहायला मिळते.

हे गाणे जुबेन नौटियाल याने गायले आहे. सिद्धार्थ आणि ताराची केमेस्ट्री अतिशय भावनिक असलेल्या या गाण्यात पाहायला मिळते. या गाण्याचे पोस्टर सिद्धार्थनेही सोशल मीडियावर शेअर केले होते.

रितेश आणि सिद्धार्थ ‘एक विलन’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटातही रितेश विलनची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी करत असून यापूर्वी त्यांनीच ‘एक विलन’चीही कथा लिहिली होती. त्या बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगले यश मिळवले होते. या चित्रपटात तारा आणि सिद्धार्थ पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. यामध्ये अभिनेत्री रकुल प्रित देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सुरुवातीला हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल.

Leave a Comment