नवरात्रीच्या निमित्ताने रेल्वेमध्ये मिळणार उपवासाचे जेवण

भारतीय रेल्वेने नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये उपवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खास उपवासाच्या मेन्यूची सोय केली आहे. उपवास असणाऱ्या प्रवाशांना रेल्वेमध्ये ई-केटरिंग सर्विसद्वारे उपवासासाठी लागणारे जेवण मिळेल.

रेल्वेची ही सर्विस 29 सप्टेंबर ते 7 ऑक्टोंबरपर्यंत सुरू राहिल. या मेन्यूमधून तुम्ही तुमच्या आवडीचे जेवण मागवू शकता. उपवासाच्या मेन्यूमध्ये शाबूदाना, मीठ, आलू टिक्की, नवरात्री थाळी, फ्रेंच फ्राइज, मलाई बर्फी, रसमलाई, मिल्क केक, लस्सी, दही यासारख्या अनेक गोष्टी मिळतील.

आयआरसीटीसीने सांगितले की, मोजक्याच रेल्वे स्टेशनवर ही जेवण देण्यात येईल. आयआरसीटीसीने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

कानपुर सेंट्रल, जबलपुर, रतलाम, जयपूर, बीना, पाटणा, राजेंद्र नगर, हजरत निजामुद्दीन, अंबाला कँट, झांशी, औरंगाबाद, अकोला, इतारसी, वसई रोड, वापी, कल्‍याण, बोरिवली, दुर्ग, दौंड, ग्‍वालियर, मथुरा, नागपूर, भोपाळ, उज्‍जैन आणि अहमदनगर या रेल्वे स्टेशनवर नवरात्री स्पेशल जेवण मिळेल.

आयआरसीटीसीची ई-केटरिंग वेबसाइट आणि फूड ऑन ट्रॅक अपद्वारे प्रवाशी ऑर्डर बुक करू शकतात. मात्र यासाठी त्यांना कमीत कमी दोन तास आधी ऑर्डर द्यावी लागेल. सुविधेनुसार प्रवाशी आधी किंवा ऑर्डर नंतर पेमेंट करू शकतात.

 

Leave a Comment