कांद्यामुळे डोळ्यांत पाणी कधी थांबणार?

प्रत्येक उगवत्या दिवसासोबत पेट्रोल, डिझेल आणि भाजीपाल्याचे दर वाढण्याच्या बातम्या आता नित्याच्या झाल्या आहेत. त्यातच कांद्याचे भाव वाढल्याच्या बातमीने सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यांतून पाणी निघत आहे. कांदे ही काय ८० ते ९० रुपयांनी विकण्याची वस्तू आहे काय? ही काय पहिल्यांदाच होणारी गोष्ट नाही. जवळपास दर वर्षी दसरा-दिवाळी जवळ आली की कांद्याचे भाव आभाळाला टेकतात. या महिन्याच्या सुरूवातीला केवळ १०-१५ रुपयांनी विकला जाणारा कांदा आता शंभरीच्या जवळ गेला आहे. यावर्षी कांद्याचे भाव चार वर्षांत सगळ्यात जास्त झाले आहे. दर वर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात कांद्याचे भाव वाढतात, हे सरकारला माहीत असते. तरीही वेळेवर उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे कांदा आणि लसणाच्या बाबतीत वारंवार ही स्थिती निर्माण होते.

ही महागाई फक्त आपल्याकडेच आहे, असे नाही. देशाच्या जवळपास प्रत्येक काना-कोपऱ्यात हीच स्थिती आहे. महागाईने हाहाकार उडालेला नाही, असा देशाचा एकही भाग नाही. कांद्यामुळे डोळ्यांत पाणी उभे राहण्याचे मुख्य कारण म्हणजे कांदा ही दैनंदिन वापरातील वस्तू आहे. जवळपास अत्यावश्यकच. तरीही सरकार गाढ झोपल्यासारखे करत आहे. कांद्याच्या भावाशी जणू आपला काही संबंधच नाही, असे त्यांचे वर्तन आहे. नाही म्हणायला कांद्याची निर्यातबंदीचा आदेश देऊन सामान्य ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला खरा. मात्र त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झाला आहे.

आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्येही कांदा 60 रुपये किलो भावाने विकला जात आहे. मग देशातील अन्य राज्यांमध्ये काय स्थिती असेल, याची कल्पनाच करावी लागेल. अर्थात ही स्थिती निर्माण होण्यामागे प्रत्येकाची कारणमीमांसा वेगवेगळी आहे.

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यंदाच्या हंगामात कांदा उत्पादन घटले आहे. कांद्याची आवक कमालीची घटल्याने कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. दिवाळीच्या सणापर्यंत कांद्याचे दर आहे तसेच राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही आवक कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे ज्या राज्यांत कांद्याचे उत्पादन होते तेथे यावर्षी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. नवे पीक येण्यास अद्याप अवधी असून नवे पीक आल्यावरच त्यावर उपाय सापडू शकतो. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात हे कायमच होत असते आणि याचा फायदा नेमके कांद्याची साठवणूक करणारे घेतात.

विरोधाभास असा, की आज कांदा महाग झाला म्हणून ग्राहक रडत असले तरी केवळ सहा महिन्यांपूर्वी हीच परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली होती. कांद्याला भाव मिळत नाही, हे त्यांचे गाऱ्हाणे होते. राज्यातील बाजार समित्यांमध्ये गेले एक वर्ष कांद्याचे भाव पडत होते. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच बाजार समितीलाही फटका बसला होता. एकट्या लासलगावच्या बाजार समितीच्या उत्पन्नात यंदाच्या मार्च महिन्यात संपलेल्या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 टक्क्यांहून अधिक घट झाली होती. एप्रिल 2018 ते जानेवारी 2019 पर्यंत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 42 लाख 92 हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन त्याद्वारे 350 कोटी रुपयांची उलाढाल झाली. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात म्हणजे सन 2017-18 मध्ये कांद्याची आवक 52 लाख 80 हजार क्विंटल होऊन त्याद्वारे 831 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.

गेल्या वर्षी यंदाच्या पेक्षा नेमकी उलट परिस्थिती होती. कांद्याचे उत्पादन भरमसाठ वाढल्याने कांद्याची आवक जोरदार होती. परंतु बाजारभाव पडलेले होते. मालाची आवक वाढली की भाव लगेच गडगडतात हा बाजाराचा नियम आहे, बाजाराच्या या निष्ठुरतेचा अनुभव कांदा उत्पादक शेतकऱ्यांएवढा अन्य कोणाच्या बाबतीत क्वचितच येत असावा. दुर्दैवाने कांद्याच्या भावाचे गणित शेतकरी आणि ग्राहकांच्या बाबतीत नेहमीच व्यस्त असते. एकीकडे भाव न मिळाल्याने चांगला कांदा मातीमोल भावाने विकावा लागतो तर कधी दुसरीकडे अव्वाच्या सव्वा भाव देऊन कवडीमोल कांदा ग्राहकांना विकत घ्यावा लागतो. मग हा कांदा शेतकरी आणि ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतो. जोपर्यंत सरकार पुढे होऊन हा प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत हे पाणी डोळ्यांत कायम राहील.

Leave a Comment