अॅमेझॉन, फ्लिपकार्टची चांदी, ही कसली मंदी!

भारतात मंदीचे वातावरण असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. या मंदीची पडछाया उत्सवांवर पडेल असा अनेक तज्ञांचा होरा होता. मात्र या तज्ञांच्या नाकावर टिच्चून ई-कॉमर्स कंपन्यांनी धंदा केली आहे. या कंपन्यांची जर चांदी होत असेल, तर ही कसली मंदी आहे असाच प्रश्न उपस्थित होतो.

नवरात्राच्या पहिल्या दिवशीपासून दोन दिग्गज ई-कॉमर्स कंपन्यांनी आपला सेल फेस्टिव्हल सुरू केला. या दोन्ही कंपन्यांनी रग्गड कमाई केल्याचे त्यांनीच सांगितले आहे. वॉलमार्ट इन्कॉर्पोरेटेडच्या मालकीची फ्लिपकार्ट आणि तिची प्रतिस्पर्धी अ‍ॅमेझॉन इन्कॉर्पोरेटेड या दोन कंपन्यांनी घटस्थापनेचा मुहूर्त पकडून शॉपिंग फेस्टिव्हल जाहीर केला. दरवर्षी अशा प्रकारचा फेस्टिव्हल योजण्यात येतो आणि यंदा उत्सवाच्या हंगामातील या फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी विक्रमी विक्री केल्याचे या कंपन्यांनी सोमवारी जाहीर केले.

फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन यांनी आपला वार्षिक विक्री शनिवारी सुरू केला. गणेशोत्सवापासून दिवाळी किंवा क्वचित ख्रिसमसपर्यंत (ऑगस्ट-डिसेंबरपर्यंत) भारतात उत्सवाचा हंगाम असतो. सर्वसाधारण भारतीय ग्राहक या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी करतात, असे मानण्यात येते. या ग्राहकांवरच दोन्ही दिग्गज कंपन्यांचे लक्ष आहे.

आशिया खंडातील तिसर्‍या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेली भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ मंदावते आहे. कारपासून बिस्किटांपर्यंत अनेक वस्तूंची विक्री खालावली आहे. त्यामुळे धास्तावलेल्या सरकारला करकपात आणि विकासाला चालना देण्यासाठी इतर उपाययोजना करणे भाग पडते आहे. अशा परिस्थितीत हे शॉपिंग फेस्टिव्हल होत आहेत. त्यामुळे जगाचे लक्ष त्याकडे लागले आहे.

“बिग बिलियन डेज” असे फ्लिपकार्टच्या फेस्टिव्हलचे नाव आहे, तर अॅमेझॉनच्या फेस्टिव्हलचे नाव “ग्रेट इंडियन फेस्टिव्हल” असे आहे. भारतीय ग्राहकांनी त्यांची निराशा केलेली नाही. हा फेस्टिव्हल सुरू होताच 36 तासांत सुमारे 750 कोटी रुपयांची विक्री एकट्या प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड प्रकारात केल्याचे अॅमेझॉनने म्हटले आहे. तर सौंदर्य प्रसाधने, चाईल्ड केअर, खाजगी कंपन्या आणि फर्निचर या सर्व प्रमुख श्रेणींतील वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन आकडी होती, असे फ्लिपकार्टने म्हटले आहे. हे फेस्टिव्हल 4 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. तोपर्यंत दोन्ही कंपन्या मिळून 5 अब्ज डॉलरचा (350 रुपये) धंदा करतील, असा अंदाज आहे.

“ग्राहक आणि विक्रेत्यांच्या सहभागाच्या विक्रमी आकड्यांमुळे हा अॅमेझॉन.इनच्या इतिहासातील पहिल्या दिवसाची सर्वात मोठी विक्री ठरली आहे,” असे अॅमेझॉनचे जागतिक वरिष्ठ उपाध्यक्ष आणि भारताचे प्रमुख अमित अग्रवाल यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे यातील 91 टक्के नवे ग्राहक हे दुय्यम आणि तिय्यम दर्जाच्या शहरांतील आहेत. यात फॅशन आणि स्मार्टफोन या वर्गांमध्ये जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदी केल्याचे दिसत आहे.

भारताच्या ई-कॉमर्स क्षेत्रात अॅमेझॉनचा प्रवेश तसा उशिराच झाला. फ्लिपकार्टने बाजारपेठेत पदार्पण केले ते 2007 मध्ये, तर अॅमेझॉनचा प्रवेश झाला 2014 मध्ये. तरीही आज अॅमेझॉनने भारतीय बाजारपेठ बऱ्यापैकी काबीज केली आहे. स्नॅपडीलसारख्या अन्य कंपन्याही यात उतरल्या आहेत.

विशेष म्हणजे अशा प्रकारच्या उत्सवाच्या काळातील शॉपिंग फेस्टिव्हलवर बंदी घालावी, अशी मागणी या महिन्याच्या सुरूवातीला कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या अग्रगण्य व्यापारी संघटनेने सरकारकडे केली होती. या संकेतस्थळांकडून देण्यात येत असलेली मोठी सूट ही ऑनलाईन किरकोळ विक्रीसाठीच्या गुंतवणूकीच्या नियमांचे उल्लंघन ठरते, असे त्यांचे म्हणणे होते. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्या दसरा आणि दिवाळीसारख्या महत्त्वाच्या उत्सवांनिमित्त कपडे आणि स्मार्टफोनपासून गृहोपयोगी वस्तूंपर्यंत सर्व गोष्टींवर सूट देतात. मोठी सूट देतात. मात्र हेच काही त्यांच्या यशाचे कारण म्हणता येणार नाही. ग्राहकांना सहसा न मिळणाऱ्या वस्तू त्यांच्यापर्यंत थेट पोचवणे आणि तेही स्वस्तात, ही त्यांची खासियत आहे.

ते काहीही असले तरी मंदीच्या मरगळलेल्या वातावरणात किमान ई-कॉमर्स क्षेत्रात तरी सकारात्मक घडामोडी घडत आहेत, हेही नसे थोडके. किमान त्यामुळे तरी सरकारला दिलासा मिळायला हरकत नाही.

Leave a Comment