पंजाबमध्ये पाकिस्तानचे वाढते जाळे


भारतात घातपाती कारवाया घडवण्यासाठी उतावीळ झालेल्या पाकिस्तानला भारत सरकारने काश्मिरमध्ये शह दिला खरा. मात्र दहशतवादी कृत्यांना सरावलेल्या पाकिस्तानने आपले जुने खेळ पुन्हा चालू केले आहेत. पाकिस्तानने पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळीला चालना देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत. त्याचा भाग असलेल्या अतिरेक्यांना गेल्या आठवड्यात पोलिसांनी पकडले. त्यानंतर आता पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे पोहोचविणारे दुसरे ड्रोनही सुरक्षा यंत्रणांना सापडले आहे.

पंजाबमधील गावांमध्ये शस्त्रास्त्रे पोहोचवण्यासाठी पाकिस्तानने वापरलेले हे दुसरे ड्रोन शुक्रवारी पोलिसांना सापडले. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या आणि अमृतसरजवळ असलेल्या अटारी येथील महावा गावातील शेतात तुटलेल्या अवस्थेतील हे ड्रोन पोलिसांनी ताब्यात घेतले.

पाकिस्तानातून राज्यात ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे पाठवण्यात येत असल्याचे अहवाल गेल्या काही दिवसांत पोलिसांना मिळाले होते. त्या घटनांची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी एका विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन केली होती. या पथकाने गेल्या आठवड्यात खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी गटाच्या चार अतिरेक्यांना अटक केली होती. त्यापैकी एकाने दिलेल्या माहितीवरून पंजाब पोलिसांनी अटारीतील महावा गावात शोधमोहीम राबवली. यावेळी एका भातशेतात ड्रोन आढळले. हे तुटलेल्या अवस्थेतील ड्रोन असून, पाकिस्तानने याद्वारे गावात शस्त्रास्त्रे उतरवली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

गेल्या एक महिन्यात भारत-पाक सीमेजवळ ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचे हे दुसरे प्रकरण आहे. त्यामुळे पंजाब पोलिसांनी याची सखोल चौकशी सुरू केली आहे. पाकिस्तानातून हे ड्रोन पाठविणाऱ्या दहशतवादी संघटनांचा माग काढण्याचाही हे पोलिस पथके प्रयत्न करत आहेत, असे पोलिस प्रवक्त्याने शुक्रवारी रात्री उशिरा सांगितले. आतापर्यंतच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे, की पाकिस्तानात कार्यरत असलेले अनेक दहशतवादी गट भारतात शस्त्रांची तस्करी करण्यात गुंतले आहेत. भारत सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून हे प्रकार सुरू झाले. हे ड्रोन मिळाल्यानंतरच पोलिसांनी दहशतवाद्यांचे रॅकेट उद्ध्वस्त केले. त्यातून आकाशदीप सिंग आणि त्याचे साथीदार बाबा बलवंतसिंग, हरभान सिंग आणि बलबीर सिंग उर्फ बिंदा यांना अटक झाली होती. त्यानंतर शुभदीपसिंग या दहशतवाद्यालाही अटक करण्यात आली.

पाकिस्तानची गुप्तचर कारवाया करणारी संस्था आयएसआयच्या कह्यात असलेल्या दोन वेगवेगळ्या जिहादी आणि खलिस्तानवादी संघटनांनी हे दोन ड्रोन पाठवल्याचे तपासातून समोर आले आहे. काळजीची बाब म्हणजे, विविध प्रकारचे दहशतवादी व संवादाचे साहित्य ड्रोनद्वारे पोहचविण्याची क्षमता त्यांनी संपादन केली आहे, हे दिसून आले आहे.

सुदैवाने हे दोन ड्रोन हस्तगत केल्यानंतर राज्य सरकारने कुठलेही राजकारण न आणता त्वरित केंद्रीय गृह मंत्रालयाशी संपर्क साधला. या ड्रोनचे तपशील केंद्र सरकारला सोपवण्यात आले. सीमेपलिकडून मोठ्या आकाराचे ड्रोन इतक्या सहजपणे देशात ये-जा करू शकतात, याबद्दल राज्य सरकारने गृह मंत्रालयाकडे चिंता व्यक्त केली. जेहादी आणि खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांनी ड्रोन पाठवण्याची क्षमता व कौशल्ये मिळवल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला, विशेषत: सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला, मोठा धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच भारतातील शांतता भंग करण्याचे पाकिस्तानचे डावपेच हाणून पडण्यासाठी भारताने त्वरित कृती करावी, असे आवाहन अमरिंदरसिंग यांनी गृहमंत्री अमित शाह यांना केले आहे.

पंजाबमध्ये 1980 ते 1990 च्या काळात खलिस्तानी चळवळ जोरात होती. मात्र नंतर ती चळवळ ओसरली. आता पुन्हा त्या चळवळीला हवा देण्याचे काम पाकिस्तानने सुरू केले आहे. त्यासाठी कॅनडा आणि ब्रिटनमध्ये छुपेपणाने कार्यरत असलेल्या काही गटांना यासाठी हाताशी धरण्यात आले आहे. यंदाच्या जून महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि श्रीलंकेच्या संघादरम्यान झालेल्या सामन्यात जम्मू व काश्मीर विषयी काही विवादाकत्मक फलके दाखवण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यापूर्वी झालेल्या सामन्यात कथित पाकिस्तानी तसेच खलिस्तानी समर्थकांनी भारताविरुद्ध आक्षेपार्ह फलके आणि चित्रे प्रदर्शित केली होती.

तीन दशकांपूर्वीची खलिस्तान चळवळ नेस्तनाबूत करण्यासाठी भारताला मोठी किंमत द्यावी लागली. पंतप्रधान इंदिरा गांधी व मुख्यमंत्री बियांतसिंग यांचा त्यात बळी गेला. हजारो निरपराध व्यक्ती मारले गेले. या सर्वाचा विचार करता पुन्हा ही चळवळ डोके वर काढू नये, यासाठी सरकारने डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यायला हवे.

Leave a Comment