सौदी अरेबिया पाकवर मेहरबान का?


जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० भारताने गेल्या महिन्यात रद्द केले. तेव्हापासून पाकिस्तानची मोठया प्रमाणावर आगपाखड सुरु आहे. हर प्रकारे प्रयत्न करूनही पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाठिंबा मिळवता आलेला नाही. आपल्या मतलबी राजकारणामुळे आणि दहशतवादाबाबतच्या दुटप्पी धोरणांमुळे पाकिस्तान जगात एकाकी पडला आहे. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने युध्दाची भाषा सुरू केली. अगदी राष्ट्रसंघातही जाऊन पाहिले. मात्र जगातल्या कुठल्याही महत्त्वाच्या देशाने पाकिस्तानला धूप घातली नाही. अपवाद एकच. तो म्हणजे सौदी अरेबिया.

राजकीय पातळीवर सौदी अरेबियाने पाकिस्तानला जवळ केले आहेच, शिवाय तेथील नेत्यांवर वैयक्तिक मेहरबानीची खैरातही उधळली आहे. अर्थात त्यामागे कुठलाही शुद्ध हेतू नसून सौदीचा स्वतःचा स्वार्थ आहे, हे वेगळे सांगायला नको.

सौदीचे राजकुमार प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे गेल्यावर्षी पाकिस्तान दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेले आतिथ्य ते अजून विसरलेले नाहीत. इम्रान हे सौदीला गेले असताना त्यांनी इस्लामचे परमपवित्र स्थान असलेले काबाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडून त्याची परतफेड केली. हा बहुमान सौदी राजघराण्याच्या अत्यंत निकटवर्तीय असलेल्या व्यक्तींनाच दिला जातो.

गेल्या काही वर्षांमध्ये, पाकिस्तानी राज्यकर्त्यांना सौदीकडून अशा प्रकारे बहुमान मिळण्याची सवयच झाली आहे. उदाहरणार्थ, पाकिस्तानचे तत्कालीन पदच्युत आणि आता अटकेत असलेले पंतप्रधान नवाझ शरीफ. डिसेंबर 2000 च्या मध्यात त्यांना अटकच्या किल्ल्यातून सोडवण्यात आले होते (तिथे त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती). त्यांना अपहरण आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरविण्यात आले होते. त्या तुरुंगात ते १४ महिने खितपत पडले होते. मात्र अचानक त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना एका खासगी जेटमधून पाकिस्तानबाहेर नेण्यात आले. हे खासगी जेट विमान सौदी राजघराण्याच्या मालकीचे होते. मक्केत येताच त्यांनी उमरा (एक मुस्लिम धार्मिक विधी) केला आणि अनपेक्षितरित्या सुटका झाल्याबद्दल ईश्वराचे आभार मानले.

मार्च २००४ मध्ये लष्करशहा आणि अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांचे माहितीमंत्री होते शेख रशीद आणि आता ते इम्रान खान सरकारमध्ये रेल्वेमंत्री आहेत. एक वाचाळ नेते म्हणून त्यांची ओळख आहे. या शेख रशीद यांच्या म्हणण्यानुसार, मुशर्रफ यांनी सौदी अरेबियाच्या नेतृत्वाशी वैयक्तिक बैठक घेतली होती. त्या बैठकीत काश्मीर, पॅलेस्टाईन, इराक आणि अफगाणिस्तानातील परिस्थितीसह विविध विषयांवर चर्चा केली होती. त्यावेळी शेख रशीद यांनी मोठ्या आढ्यतेने सांगितले होते, की उमरा केल्यानंतर खाना काबाच्या छतावर जाण्याचा बहुमान मिळालेले अध्यक्ष परवेझ मुशर्रफ हे पहिले पाकिस्तानी नेते आहेत.

त्यानंतर २०१६ मध्ये मुशर्रफ यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता, की पाकिस्तान सोडल्यानंतर काही महिन्यांनंतर ते उमरा करण्यासाठी सौदी अरेबियाला गेले होते. त्यावेळी राजा अब्दुल्ला यांनी त्यांना ते कोठे राहतात असे विचारले होते. मुशर्रफ यांच्या दाव्यानुसार, राजा अब्दुल्ला यांनी त्यांना छोटा भाऊ मानले होते आणि त्यांच्या नावावर लंडनमध्ये बँक खाते उघडून त्यांना मोठी रक्कम दिली होती.

अगदी अलीकडे सेवानिवृत्त जनरल राहिल शरीफ यांचे सौदी शासनाने शाही स्वागत केले होते. सौदीच्या नेतृत्वातील इस्लामिक मिलिटरी काउंटर टेररिझम कोअॅलिशनचे कमांडर-इन-चीफ म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. गंमत म्हणजे सौदी अरेबियात नुकत्याच झालेल्या तेल कारखान्यांवरील हल्ल्यांबाबत हे कमांडर-इन-चीफ काहीही खुलासा करू शकलेले नाहीत. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांनी रियाध येथे नुकतीच पत्रकार परिषद घेतली. मात्र त्यात याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.

आता प्रश्न हा आहे, की पाकिस्तानी नेत्यांवर असा दौलतजादा करून सौदी अरेबियाला काय मिळते? आणि पाकिस्तानचे नेते इतक्या सहजपणे उपकृत का बनतात? पाकिस्तानच्या डॉन या प्रमुख वृत्तपत्राने हाच प्रश्न विचारला आहे.

सौदीचे लाडके नेते नवाझ शरीफ यांची सुटका करावी यासाठी सौदी अरेबिया धडपड करत असल्याचे वृत्त आहे. सध्या हे शरीफ दुसर्यार कारावासाची शिक्षा भोगत आहेत. आपण त्यांना तुरुंगातून सोडणार नाही, अशी शपथच पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतली आहे. मात्र संधी मिळताच ते घुमजाव करू शकतात, असा त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे सौदीचा दबाव येताच ते शरीफ यांना तुरुंगातून सोडणार नाहीत, असे नाही.

Leave a Comment