अजितदादांच्या राजीनाम्यामागे कौटुंबिक कलह नाही- शरद पवार

अगोदरच आकुंचित होत चाललेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची आमदार आणि पक्षनेते अजितदादा पवार यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे चांगलीच गोची झाली असली तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित यांच्या राजीनाम्यामागे कौटुंबिक कलह हे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. पुण्यातील त्यांच्या मोदी बाग येथील घरी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले मी आमच्या परिवाराचा कुटुंबप्रमुख आहे आणि माझा शब्द आणि निर्णय अजूनही अखेरचा मानला जातो. अजित दादानी राजीनामा देण्यापूर्वी मला कल्पना दिली नसली तरी त्यांच्या मुलाशी मी बोललो तेव्हा त्याने माझ्यावर बँक घोटाळा प्रकरणात केस दाखल होणार याचा त्रास झाल्याने अजितदादांनी राजीनामा दिल्याचे सांगितले.

अजितदादानी त्यांचा आमदारकीचा राजीनामा हाताने लिहून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या खासगी सचिवाकडे दिला आणि नंतर हरीभाऊना फोन करून राजीनामा स्वीकारावा अशी विनंती केली असे हरिभाऊ यांनी सांगितले. ते म्हणाले, दादांचा राजीनामा आला तेव्हा मला आश्चर्य वाटले आणि तुम्ही का राजीनामा देताय असे विचारल्यावर यांनी या संदर्भात नंतर बोलतो असे उत्तर दिले. राजीनामा देण्यापूर्वी अजितदादानी त्यांच्या मुलाला राजकारण बास झाले आता शेती किंवा उद्योग करू असेही सांगितल्याचे कळते.

दरम्यान शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांना डॉक्टरनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Leave a Comment