जगातील सर्वात महागडे बोर्डिंग स्कूल- ‘ला रोसी’

boarding
स्विस आल्प्सच्या कुशीत वसलेल्या, गेली शंभर वर्षे कार्यरत असलेल्या या बोर्डिंग स्कूलमध्ये अनेक देशांचे राजपुत्र, राजकन्या, अतिश्रीमंत शेख, आणि अब्जाधीश, शिक्षणासाठी राहून गेले आहेत. आजच्या काळामध्येही जगभरातील अतिश्रीमंत आणि प्रभावी व्यक्तिमत्वांची अपत्ये ‘ला रोसी’ येथे शिक्षणासाठी येत असतात. या बोर्डिंग स्कूलची सुरुवात होऊन आता १३५ वर्षे उलटून गेली असली, तरी आजही हे बोर्डिंग स्कूल जगातील प्रथितयश आणि प्रतिष्ठित बोर्डिंग स्कूल म्हणून ओळखले जाते. अनेक देशांचे राजे, राजपुत्र, राजकन्या, इतकेच नाही, तर निरनिराळ्या कलाक्षेत्रांमध्ये नाव कमाविलेल्या अनेक नामवंत व्यक्तिमत्वांनी येथे शिक्षण घेतले आहे. तसेच अनेक मालिका, चित्रपटांचे चित्रीकरणही या सुप्रसिद्ध बोर्डिंग स्कूलमध्ये झाले आहे. जगभरातील नामवंत आणि अतिश्रीमंत, त्यांच्या अपत्यांच्या शिक्षणासाठी ‘ला रोसी’ ला पसंती देत असले, तरी सामान्य माणसाच्या दृष्टीने मात्र ही संस्था स्वप्नवत, असामान्य आहे.
boarding1
ला रोसीचे औपचारिक नाव ‘इंस्टीट्युट ला रोसी’ असून, या स्विस बोर्डिंग स्कूलमध्ये मोनॅको देशाचे राजे प्रिन्स रेनियर, इराण देशाचे शाह, इजिप्तचे राजे फौआद, स्पेनचे राजे जुआन कार्लोस, बेल्जियमचे राजे आल्बर्ट, प्रिन्सेस डायनाचे मित्र डोडी अल फायेद इत्यादी सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वे या शाळेचे माजी विद्यार्थी होते. या व्यतिरिक्त अनेक हॉलीवूड अभिनेत्यांची, अब्जाधीश व्यावसायिकांची मुले, तसेह इतर देशांतील राजघराण्यांचे सदस्य देखील या शाळेमध्ये शिक्षणघेण्यासाठी राहिले आहेत. हे बोर्डिंग स्कूल जरी अतिशय ‘हाय प्रोफाईल’ समजले जात असले, तरी या बोर्डिंग स्कूल पर्यंत प्रसारमाध्यमांचे हात क्वचितच पोहोचताना पहावयास मिळतात.
boarding2
या बोर्डिंग स्कूलपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक टुमदार गावांतून वाट काढीत जावे लागते. हिमाच्छादित पर्वतांच्या कुशीमध्ये, लेक जेनेव्हाच्या जवळ हे भव्य बोर्डिंग स्कूल उभे आहे. ही वास्तू चौदाव्या शतकामध्ये बांधली गेली असून, या वास्तूला ‘शॅटो डे रोसी’ या नावाने ओळखले जात असे. बाहेरच्या जगातून या शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्याचे सर्व जगच बदलून जात असे. या बोर्डिंग स्कूलचा परिसर अतिशय नयनरम्य असून, येथे शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी ११०,००० डॉलर्स फी भरावी लागते. त्यामुळे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे त्याचे पालक सुमारे एक मिलियन डॉलर्स खर्च करीत असतात.
boarding3
या शाळेमध्ये एका वेळेस एकूण ३८० विद्यार्थी असून, या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तब्बल १८० शिक्षक येथे तैनात आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्गामध्ये जास्तीत जास्त केवळ बारा विद्यार्थी असतात. काही वर्गांमध्ये तर केवळ तीन ते चार विद्यार्थीही आहेत. दर वर्षी या शाळेमध्ये प्रवेशासाठी ३५० अर्ज येत असून, त्यापैकी केवळ ऐंशी ते शंभर विद्यार्थ्यांची निवड दर वर्षी केली जात असते. प्रवेश दिला जाण्यापूर्वी विद्यार्थ्याच्या सोबत त्याच्या पालकांची देखील मुलाखत घेतली जाते. तसेच मुलखती पूर्वी इंग्रजी, फ्रेंच आणि गणिताच्या चाचण्या देखील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे गरजेचे असते. एकदा विद्यार्थ्याला या शाळेमध्ये प्रवेश मिळाला, की मग त्याच्या सर्वांगी विकासाची जबाबदारी संपूर्णपणे ही शाळा घेत असते.

Leave a Comment