कठिण प्रसंगी साथ देणाऱ्या सर्वांचे शरद पवारांनी मानले आभार


मुंबई – राज्य सहकारी बँकेतील कोणत्याही पदावर नसताना गुन्हा दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. ईडीने त्यांना तूर्तास चौकशीसाठी येण्याची गरज नसल्याचे पत्र पाठवल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर शरद पवार यांनी एका विशिष्ट राजकीय परिस्थितीमध्ये विरोधी पक्षांच्या प्रमुखांचे चारित्र्य मलीन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. तसेच त्यांनी आपली भूमिका कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करुन बदलली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर कठिण प्रसंगी साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानताना शरद पवार यांनी शिवसेनेचेही आभार मानले.

शरद पवार म्हणाले की, मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल असे महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबईचे पोलिस आयुक्त सहपोलीस आयुक्तांनी यांनी सांगत कार्यालयात न जाण्याची विनंती केली. महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाल्यापासून संतापाची लाट उसळली आहे. शहरा शहरात आणि गावागावांत त्याची प्रचिती येत आहे. मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोकांना देखील बाहेरच अडवले जात असल्याच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या. मी स्वत: राज्यामध्ये गृह खात्याची जबाबदारी सांभाळली असल्यामुळे माझ्या अ‍ॅक्शनमुळे कायदा-सुव्यवस्था ढासळू नये. तसेच सामान्या माणसाला त्याची किंमत मोजावी लागू नये यासाठी ईडीच्या कार्यालयात जाणे मी स्थगित केले, असे पवारांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण कार्यकर्ते आणि याप्रश्नाच्या संबंधी आम्हाला साथ देणारे प्रागतिक विचाराचे लोक या सर्वांना मी अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राची सामूहिक शक्ती कुणी अत्याचार आणि अन्याय करण्यासंदर्भातील भूमिका घेतली तर कशी एकत्र येते हे त्यांनी दाखवून दिले, असे सांगत अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजपला टोला लगावला. काँग्रेस खासदार राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ नेत्यांनीही मला पाठींबा दिला. संजय राऊत यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल देखील आभार मानले.

Leave a Comment