आजीच्या मार्गावर ज्योतिरादित्य शिंदे?


मध्य प्रदेशात काँग्रेसला विजयाची चव चाखण्यास मदत करणारे नेते ज्योतिरादित्य शिंदे आपल्या आजीच्या वाटेवरून चालण्यास सज्ज झाले आहेत. गेल्या दोन दशकांपासून काँग्रेसची सेवा करणाऱ्या शिंदे यांना आपल्या पक्षातील गटबाजीचा कंटाळा आला आहे. त्यामुळे लवकरच ‘कमळा’शी त्यांनी घरोबा केला तर आश्चर्य वाटायला नको. आपल्याला पक्षात अडगळीत टाकण्यात येत असल्याची शिंदे यांची भावना झाली आहे. त्यामुळे काँग्रेसला रामराम करण्याच्या बेतात ते आहेत. त्यांच्या पाठिराख्यांनी याबाबत पुरेसे संकेत दिले आहेत. त्यामुळे अगदी भाजपमध्ये गेले नाहीत तर काँग्रेसशिवायचा आपला नवा डाव सुरू करण्याच्या बेतात ज्योतिरादित्य असल्याचे बोलले जात आहे.

ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज असलेल्या ज्योतिरादित्य यांचा मध्य प्रदेशात चांगलाच वट आहे. त्यांना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद हवे आहे. मात्र पक्ष नेतृत्वाने त्यांना हे पद देण्यास नकार दिला तर त्यांच्या आजीप्रमाणे तेही विद्यमान सरकार खाली खेचण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असे त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ज्योतिरादित्य यांच्या आजी दिवंगत विजयाराजे शिंदे या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या होत्या. विजयाराजे या त्यावेळी काँग्रेसमध्ये होत्या आणि त्यांनी 1967 मध्ये काँग्रेस सरकार पाडले होते. द्वारका प्रसाद मिश्र उर्फ डी. पी. मिश्रा हे त्यावेळी मुख्यमंत्री होते. युवक काँग्रेसच्या एका कार्यक्रमात भाषण करताना मिश्रा यांनी राजे-महाराजांबद्दल शेरेबाजी केली. त्याच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या विजयाराजे यांनी ती शेरेबाजी खूप खटकली आणि त्यांनी मिश्रा यांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. त्यांनी मिश्रा यांच्या विरोधात असंतुष्ट काँग्रेस आमदारांना एकत्र करणे सुरू केले. तेव्हा जनसंघाचे 78 आणि सोशलिस्ट पार्टीचे 32 आमदार होते. याशिवाय अपक्ष व अन्य छोट्या पक्षांच्या आमदारांना विजयाराजे यांनी सोबत घेतले. काँग्रेसचे 36 आमदार जमताच त्यांनी विधानसभेत सरकारविरुद्ध प्रस्ताव दाखल केला. मिश्रा यांचे सरकार पडताच गोविंद नारायण सिंह यांच्या नेतृत्वात संयुक्त विधायक दलाचे (संविद) सरकार स्थापन झाले. देशातील हे पहिले आघाडी सरकार होते. “त्याच इतिहासाची मध्य प्रदेशात पुनरावृत्ती होऊ शकते,” असे शिंदे यांच्या एका खास सहकाऱ्याने सांगितल्याचे डेक्कन क्रॉनिकल वृत्तपत्राने म्हटले आहे.

योगायोग असा, की ज्योतिरादित्य यांचा मुलगा आर्यन याने नुकतेच एक काव्यात्म ट्वीट केले होते. एखाद्याच्या प्रतिष्ठेवर आघात झाला असेल तर त्याचा बदला घ्यावा, असे त्यात त्याने म्हटले होते.ज्योतिरादित्य शिंदे हे मध्य प्रदेशातील विशिष्ट भागाचे नेते आहेत आणि पक्ष नेतृत्वाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे, असे वक्तव्य मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर नुकतेच केले होते. त्याचा संदर्भ या ट्वीटला होता.

खुद्द ज्योतिरादित्य यांनीही या चर्चांना खतपाणी घातले आहे. मंगळवारी त्यांनी राज्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर नीमच येथे पत्रकारांशी बोलताना आपल्याचा पक्षाच्या सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले. पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणाने मी समाधानी नाही. ही पाहणी पुन्हा करावी, अशी मागणी त्यांनी केली. गंमत म्हणजे त्यांच्या या दौऱ्यापूर्वी केवळ एक दिवस आधी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी याच भागांचा दौरा केला होता. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करून त्यांनी जणू जाहीर बंडच पुकारले होते.

दरम्यान, पक्षाचे आणखी एक नेते दिग्विजय सिंह यांनी शनिवारी राज्यातील ग्वाल्हेर-चंबळ प्रांताचा दौरा केला. हा भाग ज्योतिरादित्य यांचा बालेकिल्ला समजला जातो. ज्योतिरादित्य यांच्याशी निष्ठावान समजल्या जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांना आपल्याकडे ओढण्याचा त्यांचा इरादा असल्याचे मानले जात आहे.

खरे पाहता मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य आणि दिग्विजय सिंह यांच्यात चढाओढ मानले जाते. हा संघर्ष खूप जुना आहे. राज्यातील एक गट ज्योतिरादित्य यांचा आहे तर दुसरा गट दिग्विजय व कमलनाथ यांचा मानला जातो. गेल्या काही दिवसांत या दोन्ही गटांनी शक्तिप्रदर्शनाचा मार्ग चोखाळला आहे. ज्योतिरादित्य यांना प्रदेश अध्यक्षपद हवे आहे, तर या पदाची सूत्रे त्यांच्या हाती जाऊ नयेत यासाठी दिग्विजय धडपड करत आहेत. दिग्विजय हे सरकारमध्ये हस्तक्षेप करतात असा आरोप अलीकडेच राज्याचे वनमंत्री उमंग सिंघार यांनी केला होता. ते ज्योतिरादित्य समर्थक मानले जातात.

हा वाद एवढा वाढला आहे, की सोनिया गांधी यांनी या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी माजी केंद्रीय मंत्री ए. के अँटोनी यांच्यावर सोपवली आहे. अँटोनी यांच्या अध्यक्षतेखालील पॅनल लवकरच आपला अहवाल सोनियांना सोपवणार आहे. या अहवालाची प्रतीक्षा काँग्रेसजनांना निश्चितच असेल.

Leave a Comment