तुम्ही पाहिले आहे का ट्रिपल सीटमधील नवे गाणे ?


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील या त्रिकूटाचा ट्रिपल सीट हा चित्रपट येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरनंतर नुकताच चित्रपटाचा धमाल टीझर रिलीज करण्यात आला होता. टीझर पाहुन चित्रपटाबद्दलची उत्सुकता निश्चितच वाढली. आता नुकतेच या चित्रपटातील पहिले-वहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. मराठीतील सुपरस्टार अभिनेता अंकुश चौधरी आणि बिगबॉस फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे यांच्यातील केमिस्ट्री दाखवणारं ट्रिपल सीट चित्रपटातील ‘नाते हे कोणते’ या गाण्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

संकेत पावसे यांनी अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट, अहमदनगर फिल्म कंपनी निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अविनाश विश्वजित यांनी संगीतबद्ध केलेले ‘नाते हे कोणते’ हे गाणे हरगुन कौर आणि रोहित राऊत यांनी आपल्या सुरेल आवाजात गायले आहे. गाण्याच्या बोलाप्रमाणेच ‘नाते हे कोणते, कोणास ना, कळले कधी’ अशी या दोघांच्याही मनाची अवस्था या गाण्यात झालेली दिसते. अंकुश आणि शिवानी दोघेही या गाण्यात भान विसरून एकमेकांशी फोनवर गप्पा मारताना दिसत आहेत. या दोघांच्या वायरलेस प्रेमाची गोष्ट अशी चित्रपटाची टॅगलाईन असल्यामुळे त्यांच्या या वायरलेस प्रेमात खुलणाऱ्या केमिस्ट्रीची झलक गाण्यात नक्कीच दिसून येते.

अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांच्यासह ट्रिपल सीट चित्रपटामध्ये प्रविण विठ्ठल तरडे, शिल्पा ठाकरे, राकेश बेदी, विद्याधर जोशी, वैभव मांगले, योगेश शिरसाट आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. ट्रिपल सीट हा चित्रपटा येत्या २४ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार होता पण आता विधानसभा निवडणुकांच्या निकालामुळे चित्रपट आता येत्या २५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज करण्यात येणार आहे.

Leave a Comment