मद्यप्रेमींसाठी राज्य सरकारचा ‘पारदर्शी’ निर्णय


मुंबई – राज्य सरकारने मद्यप्रेमींसाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पारदर्शी’ निर्णय घेतला आहे. गृह विभागाच्या निर्णयानुसार आता एका वेळी 10 हजार रुपयांच्या 12 बाटल्या तळीरामांना बाळगता येणार असल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले आहे. देशी आणि विदेशी मद्य बाळगवण्यावर यापूर्वी मर्यादा अस्पष्ट होती. वारंवार दुकान गाठण्याची गरज शहरापासून दूर राहणाऱ्या मद्यपींना पडू नये, यासाठी एकाच वेळी 12 युनिट (१० हजारांचे मद्य ) बाळगता येईल, असा सरकारचा आदेश आहे.

देशी मद्य, विदेशी मद्य, आयात मद्य, बियर, वाईन, ताडी, अल्कोहोल असा मद्य बाळगण्यासाठी दारुबंदी कायद्याने परवाना दिला जातो. 2 वर्षांपूर्वी मुंबईतील मालवणी विषारी दारुमुळे 100 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कायद्यात सुधारणा करण्याचे ठरले होते. दारूबंदी असलेल्या भागात दारूच्या अवैध विक्रीवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या प्रयत्नात, राज्य सरकारने ग्राहकांकडून दारू ताब्यात घेण्यास कायदेशीर ‘विहित मर्यादा’ निश्चित केली आहे. महाराष्ट्रात वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर हे 3 जिल्हे दारुबंदीत आहेत.

महाराष्ट्र निषेध (दुरुस्ती) अध्यादेश २०१९ मध्ये दारुबंदी जिल्ह्यांचा समावेश असलेल्या ‘पूर्णपणे निषिद्ध भागा’ची व्याख्या देण्यात आली आहे. दारू विक्री, खरेदी, ताब्यात घेणे आणि वापरण्यास या जिल्ह्यात बंदी घातली आहे. या अध्यादेशाने पूर्णपणे निषिद्ध भागात केलेल्या गुन्ह्यांसाठी शिक्षा प्रमाण वाढवले आहे.

गृह विभागाने दिलेल्या आदेशानुसार ग्राहकांना मिळू शकणार्‍या दारूच्या युनिटची निर्धारित मर्यादा घालण्यात आली आहे. ग्राहक त्या अनुषंगाने एकावेळी इंडियन मेड फॉरेन लिकर (आयएमएफएल) किंवा आयात केलेली मद्य, वाइन, ताडी, बिअर आणि द्रवपदार्थ असलेल्या 12 पेक्षा जास्त युनिट घेऊ शकत नाहीत. देशी दारू (सीएल) साठी ही मर्यादा फक्त 2 युनिट्स आहे. एका युनिटचे देशी दारू, आयएमएफएल, आयात केलेली मद्य, ताडी आणि अल्कोहोलसाठी 2 हजार 600 मिली तर वाइन आणि बिअरसाठी 1 हजार मिलीची मर्यादा आहे.

Leave a Comment