शरद पवारांबद्दल बोलताना भावूक झाले उदयनराजे


सातारा : नुकताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा दौरा केल्यानंतर शरद पवार यांच्याबद्दल बोलताना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसले हे भावुक झाले आहेत. तसेच उदयनराजे यांना यावेळी अश्रू अनावर झाले.

शरद पवार यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत अर्ज दाखल केला तर ही निवडणूक मी लढवणार नाही. शरद पवार यांच्याबद्दल मला आजही खूप आदर असल्याचे भावुक उद्गार यावेळी उदयनराजेंनी काढले. उदयनराजे भावनिक झाल्याने सर्वच संभ्रमात पडल्याचे पाहायला मिळाले.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. ही पोटनिवडणूक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसोबतच होणार असल्यामुळे 21 ऑक्टोबरला या जागेसाठीही मतदान होईल आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी होईल.

आपल्या पदाचा राजीनामा देत साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर साताऱ्यासह इतर भागातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वांचा विरोध असताना लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट दिले. जनतेनेही उदयनराजेंच्या बाजूने कौल दिला. मग त्यांनी आता अवघ्या तीन महिन्यात पक्ष का सोडला, असा प्रश्न राष्ट्रवादीकडून विचारला जात आहे.

शरद पवार यांनी उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर रविवारी पहिल्यांदाच साताऱ्यात दाखल होत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शरद पवारांचे साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. शरद पवारांच्या स्वागताला साताऱ्यात झालेल्या गर्दीनंतर उदयनराजेंसमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी घोषणा केली, पण उदयनराजेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा त्यावेळी केली नाही. उदयनराजेंसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात होते. कारण विधानसभेसोबत साताऱ्यातील पोटनिवडणूक घेण्यात यावी, अशी अट भाजप प्रवेशावेळी उदयनराजेंनी ठेवल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment