सुबोध-भरतच्या आगामी ‘आप्पा आणि बाप्पा’चा ट्रेलर रिलीज


पहिल्यांदाच अभिनेता सुबोध भावे आणि भरत जाधव हे दोघे स्क्रिन शेअर करणार आहेत. ही जोडी ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज सोहळा पार पडला. चित्रपटाची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती. यापूर्वी खरे तर भरत आणि सुबोध यांनी ‘उलाढाल’ या चित्रपटात काम केले होते. पण त्यांचे फारसे सीन्स त्यामध्ये एकत्र नव्हते. पण, त्यांनी ही सगळी कसर ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटाद्वारे भरून काढली आहे.

पुण्यात राहणाऱ्या आप्पा कुलकर्णी म्हणजेच ‘भरत’च्या घरात या चित्रपटाची कथा घडते. आप्पाचे वडील म्हणजेच दिलीप प्रभावळकर त्याला यंदाचा गणेशोत्सव थाटात साजरा करायला सांगतात. त्यासाठी त्याला पीएफमधून पैसे काढायला सांगतात. पण ऐनवेळी बँक पैसे द्यायला टाळाटाळ करते. त्यामुळे आप्पाला पैसे उसने घेऊन सण साजरा करावा लागतो. पण, ऐनवेळी देणेकरी दारावर येऊन बसतात आणि तो थेट गणपती बाप्पाला आपल्याला या विघ्नातून बाहेर काढायला सांगतो. त्यांनंतर नक्की काय होते ते या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

या चित्रपटात भरत, सुबोध, दिलीप प्रभावळकर यांच्याप्रमाणेच सुनील जगताप आणि संपदा कुलकर्णी-जोगळेकर हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सुनील आणि सुबोध यांची जोडी ‘तुला पाहते रे’ आणि ‘अश्रूंची झाली फुले’ नंतर या चित्रपटातही एकत्र पाहायला मिळणार आहे. तर, संपदा कुलकर्णी-जोगळेकर ही देखील बऱ्याच दिवसांनी चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

हा चित्रपट ‘सन ऑफ सरदार’, आणि ‘अतिथी तुम कब जाओगे’ यासारखा चित्रपटाचे दिग्दर्शक अश्विनी धीर यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. तर ‘पॅनोरमा फिल्म्स’ने या चित्रपटाची प्रस्तुती आणि वितरणाची जबाबदारी घेतली आहे.

चित्रपटाला सारंग कुलकर्णी, सायली खरे यांनी संगीत दिले असून चित्रपटासाठी ‘अभंग रिपोस्ट’ या बँडने एक खास गाणे तयार केले आहे. हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबर रोजी रिलीज होत असल्यामुळे ‘आप्पा आणि बाप्पा’ने रुपेरी पडद्यावर काय धुमाकूळ घातला आहे हे तुम्हाला पहायचे असेल तर थोडी प्रतीक्षा करावी लागेल.

Leave a Comment