अखेर रिलीज झाला ‘सांड की आँख’चा ट्रेलर


अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित ‘सांड की आँख’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले असून वयाच्या साठीनंतर हातात रिव्हॉल्वर घेऊन अचूक निशाणा साधणाऱ्या शूटर दादींची ही सत्य कथा आहे. भूमी पेडणेकर चंद्रो तर तापसी पन्नू प्रकाशीच्या भूमिकेत दिसणार आहे.

सत्य कथेवर आधारित हा चित्रपट आहे. ‘रिव्हॉल्वर दादी’ म्हणून वय वर्षे ८६ असणाऱ्या चंद्रो तोमर गावात प्रसिद्ध आहेत. नेमबाजीचे त्यांचे कौशल्य पाहिले की भलेभले तोंडात बोट टाकून त्यांच्याकडे बघत बसतात. आजींनी नेमबाजीच्या २५ राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांत १०० हून अधिक पदके जिंकली आहेत.

प्रकाशी तोमर दुसऱ्या आजींचे नाव आहे. या चंद्रो तोमर यांच्या नणंद आहेत आणि यांचेही वय ८२ आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी जेव्हा त्यांनी रिव्हॉल्वर शूटींगला सुरूवात केली तेव्हा अनेकांनी तिची खिल्ली उडवली. पण सगळ्याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी आपला निशाणा साधला आणि सगळ्या जागाचे लक्ष वेधून घेतले. अशा या जिगरबाज आज्जींची अफलातून गोष्ट आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Leave a Comment