पाकिस्तान आणि जर्मनीतून खलिस्तानला खतपाणी


पंजाबला सुमारे दोन दशके त्रस्त करणाऱ्या खलिस्तानी चळवळीला पुन्हा जीवंत करण्याचे प्रयत्न पाकिस्तान आणि जर्मनीत बसलेले दहशतवादी संघटनांचे म्होरके करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे म्होरके पंजाबात पुन्हा हिंसेला खतपाणी घालत आहेत. राज्यात अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे.

सोशल मीडियावर धर्माच्या संबंधात जे युवक सतत पोस्ट टाकतात, अशा युवकांना हे लोक हेरतात आणि त्यांच्याशी संपर्क साधतात. समाजातून बहिष्कृत करण्यात आलेल्या लोकांनाही या दहशतवादी टोळ्या हेरून ठेवतात. आपली ओळख निर्माण करण्यासाठी असे काही करावे लागेल, की समाज आपल्या नावाने थरथर कापेल असे या लोकांना वाटत असते. त्याचा फायदा या टोळ्या घेतात.

पंजाबच्या गुप्तचर विभागाच्या विशेष कारवाई पथकाने नुकतेच खलिस्तान जिंदाबाद फोर्स (केझेडएफ) या संघटनेच्या चार दहशतवाद्यांना अटक केली. बलवंतसिंग उर्फ बाबा उर्फ निहंग, अर्शदीपसिंग उर्फ आकाश रंधावा, हरभजनसिंग व दलबीर सिंग अशी या चौघांची नावे आहेत. त्यांना अमृतसरच्या न्यायालयाने १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

या चौघांकडे केलेल्या चौकशीतून ही गोष्ट निष्पन्न झाली, की पाकिस्तानात असलेला रणजीतसिंग नीटा आणि जर्मनीत असलेला गुरमीतसिंग बग्गा उर्फ डॉक्टर हे पंजाबमध्ये अतिरेकी कारवाया वाढवण्यासाठी स्लीपर सेल आणि दहशतवाद्यांची भरती करत आहेत. त्यांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संधान साधून जम्मू-काश्मिर आणि पंजाबमध्ये मोठा घातपात करण्याची योजना आखली होती.

यातील रणजितसिंग नीटा याचे नाव भारताने 2008 साली पाकिस्तानला सोपवलेल्या 20 मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट आहे. केझेडएफ या संघटनेचा तो प्रमुख म्हणवतो. पंजाबात दहशतवाद पुनर्जीवित करण्याचा कट रचल्याचा त्याच्यावर आरोप आहे.पाकिस्तान आणि जर्मनीतून दहशतवादी कारवाया घडवणारा नीटा गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात दडून बसला आहे. तो मूळचा जम्मूचा रहिवासी असून जम्मूतील सांबा आणि आरएसपुरा भागात तो लहान-मोठे गुन्हे करत असे. याच दरम्यान त्याचा संपर्क पाकिस्तानातील तस्करांशी झाला. पाकिस्तानी तस्करांनीच नीटा आणि आयएसआय यांच्या तारा जुळवल्या.

जम्मू-काश्मिरच्या सीमेद्वारे तो अनेकदा पाकिस्तानला गेला. तेथे त्याने दहशतवादी कारवाया करण्याचे प्रशिक्षण घेतले. आयएसआयने नीटाला बॉम्बस्फोट करण्यासोबतच गर्दीच्या भागांमध्ये हँड ग्रेनेड फेकण्याचेही प्रशिक्षण दिले.

नीटाने 1988 मध्ये श्री हरमंदिर साहिबमध्ये झालेल्या ऑपरेशन ब्लॅक थंडरनंतर आयएसआयच्या इशाऱ्यावरून पंजाबात कारवाया सुरू केल्या. केझेडएफला युरोपीय महासंघाने 2005 साली दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले. त्यानंतर नीटाने पाकिस्तानातच आश्रयाला असलेल्या खालिस्तान कमांडो फोर्सचा म्होरक्या परमजीतसिंग पंजवड याच्याशी हातमिळवणी केली.

पंजाब पोलिसांनी पकडलेल्या दहशतवाद्यांचे संबंध अशा धोकादायक दहशतवाद्याशी असल्याचे आढळल्यामुळे सुरक्षा यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या तरणतारण जिल्ह्यात त्यांची धरपकड झाली आणि त्यांच्याकडून पाच एके-47, पिस्तूल, सॅटेलाईट फोन, हातबॉम्ब तसेच दारुगोळा जप्त करण्यात आला. ही शस्त्रे पाकिस्तानच्या आयएसआयने बळावर उभ्या राहिलेल्या जेहादी व खालिस्तान समर्थक संघटनांनी पुरविली असल्याचा संशय पंजाबचे पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी व्यक्त केला आहे. म्हणूनच या दहशतवाद्यांची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) करण्याचा निर्णय मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी घेतला आहे.

पंजाब प्रांतात शीखांचा स्वतंत्र देश अस्तित्वात यावा, ही तशी जुनी मागणी. या काल्पनिक स्वतंत्र देशाचे नाव खलिस्तान असे ठेवण्यात आले होते. पंजाबी भाषेतील खालसा (पवित्र) या शब्दावरून हे नाव ठेवण्यात आले होते. या खलिस्तानसाठी 1970 व 80 च्या दशकात चळवळ जोरात होती आणि शीखांच्या या मागणीला या काळात दहशतवाद व हिंसाचाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री बेअंत सिंग, जनरल अरुण श्रीधर वैद्य अशा अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचा बळी या दहशतवादाने घेतला. मात्र पंजाब पोलिसांनी 1986-87 पासून मोठ्या निर्धाराने कारवाई करून ही चळवळ मोडीत काढली. आता ही चळवळ मुख्यतः परदेशांत राहणाऱ्या समुदायापुरती व सांस्कृतिक चळवळीपुरती मर्यादित आहे. मात्र तिची पाळेमुळे पुन्हा पसरू लागली आहेत, हे ताज्या उदाहरणाने दिसून आले आहे. त्याची दखल आपल्याला घ्यावीच लागेल.

Leave a Comment