मोदी बोलले, पण वाचाळवीर ऐकणार का?


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यव्यापी महाजनादेश यात्रेच्या समारोप प्रसंगी नाशिक येथे मोदी यांचे भाषण झाले. त्यावेळी त्यांनी राम मंदिराबाबत अनावश्य कवक्तव्ये करणाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. यशाच्या शिखरावर असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि सहकारी पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खडे बोल सुनावले. आपल्या तोंडाला आवर घाला, असे त्यांनी हळूच सांगितले. मात्र त्यांचे अनुयायी त्यांचे म्हणणे ऐकणार काय हा खरा प्रश्न आहे.

“गेल्या दोन तीन आठवड्यांपासून अयोध्येतील राम मंदिराविषयी काही उलटसुलट वक्तव्ये काही तोंडाळ लोक करत आहेत. या विषयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. संबंधित सर्व पक्ष आपली बाजू मांडत आहेत आणि न्यायालय सर्वांचे म्हणणे ऐकून घेत आहे. अशावेळी हे ‘बयान बहाद्दर’ कोठून आले यामुळे मी अस्वस्थ आहे. त्यांना संपूर्ण प्रक्रियेत अडथळा निर्माण करायचा आहे का, हा प्रश्न आहे. आमचा सर्वोच्च न्यायालयावर भरवसा असला पाहिजे. देशाच्या संविधानावर विश्वास असला पाहिजे. आपण हात जोडून विनंती करतो की, कृपा करून प्रभू रामचंद्रासाठी डोळे झाकून न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा,” असे मोदी म्हणाले.

मोदी यांनी हा जो उपदेश केला त्याचा परिणाम अन्य पक्षांच्या नेत्यांवर होवो की न होवो, परंतु किमान भाजप नेत्यांवर तरी व्हायला हवा. अर्थात त्यांच्या या सल्ल्यात कोणाचेही नाव घेतलेले नव्हते, त्यामुळे त्यांचा रोख नक्की कोणावर होता हे कळायला मार्ग नाही. ज्या प्रमाणे कलम 370 रद्द करण्यात आले त्याच प्रमाणे अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी पावले पुढे टाकायला हवीत, असे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. त्यामुळे मोदींचा रोख त्यांच्यावरच असल्याचे सर्वसामान्यपणे मानले गेले.

म्हणून शिवसेनेच्या वतीने त्याला तोडीस तोड उत्तर देण्यात आले. ” मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांना सगळ्यात जास्त त्रास स्वपक्षातील बडबोल्यांपासूनच होत आहे. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी तोंडास कुलूप लावावे असे मागे पंतप्रधानांना हात जोडून सांगावे लागले. भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर असतील नाहीतर मंत्री गिरिराज सिंग, त्यांची अनेक वक्तव्ये मोदी यांच्या प्रतिमेस तडे देणारीच आहेत. राममंदिराचा विषय न्यायालयात आहे हे खरे, पण राममंदिर या विषयावर हवे तसे बोलणारे वाचाळवीर भाजपातच आहेत,” असे ‘सामना’तील अग्रलेखातून सांगण्यात आले.

त्यात तथ्यही आहे. राम मंदिराच्या प्रश्नावरून वावदूक वक्तव्ये करणाऱ्यांची संख्या मोदी यांच्या स्वतःच्या पक्षात काही कमी नाही. सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणाची सुनावणी अर्ध्यापेक्षा जास्त झाली आहे. आता तर या प्रकरणाच्या निकालाची मुदतही न्यायालयाने नेमून दिली आहे. त्यामुळे अशी वक्तव्ये करण्याला काहीही अर्थ उरत नाही. अर्थात न्यायालयापुढे असलेल्या प्रकरणाबाबत कोणी आपले विचार व्यक्तच करू नयेत, असे नाही. मात्र एवढ्या संवेदनशील प्रकरणात आपली प्रतिक्रिया जरा जपू द्यायचा हवी, हे भान प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. खासकरून नेत्यांच्या बाबतीत ही गोष्ट जास्त खरी आहे.

भाजपची अडचण ही आहे, की असे बयान बहाद्दर भाजपमध्येही आहे आणि ते राम मंदिरच नव्हे तर कोणत्याही विषयावर अशी वक्तव्ये करतात. या वक्तव्यांवरून मग विरोधी पक्ष भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. अयोध्या प्रकरणातही भाजपा नेत्यांची अशी अनेक वक्तव्ये आली आहेत जी वावदूकच म्हटली पाहिजेत.

अर्थात भाजप नेतृत्वाने आपल्या या बयान बहाद्दर नेत्यांना आवरण्याचे काही कमी प्रयत्न केलेले नाहीत. मोदी आणि अमित शहा यांनीही वेळोवेळी त्यांना इशारे दिले आहेत. मात्र हे वाचाळवीर अधूनमधून डोके वर काढतातच. साध्वी प्रज्ञा किंवा साध्वी प्राची असे नेते याबाबतीत आघाडीवर आहेत. भाजपला अशा नेत्यांमुळे अनेकदा मान खाली घालावी लागली आहे. अशा वाचाळवीर नेत्यांमुळे केवळ संबंधित राजकीय पक्षालाच त्रास होतो, असे नव्हे तर भारतीय राजकारणाची प्रतिमाही डागाळते. फक्त प्रसिद्धी मिळते म्हणून हे नेते आपली जीभ सैल सोडतात. आता मोदींनी कान टोचले म्हणून त्यांची जीभ ते आवरणार का, हा प्रश्नच आहे.

Leave a Comment