रणवीर सिंह आणि आलिया भट यांची मुख्य भूमिका असलेल्या गल्ली बॉय या चित्रपटाची ऑस्करवारी निश्चित झाल्याने चित्रपटाच्या टीमवर सर्वांकडूनच कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण कितीही झाले तरी यंदा देखील भारताला ऑस्कर मिळवणे शक्य नाही असे म्हणत स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान याने एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमधून गल्ली बॉय या चित्रपटाचे वास्तविक वाचाळवीर कमाल याने कौतुक केले, हा चित्रपट खरोखरच उत्तम आहे असेही म्हटले, पण त्याला जोडूनच गल्ली बॉय हा अनेक हॉलिवूड चित्रपटांची कॉपी करून बनवला असल्याचा दावा केला, साहजिकच कॉपी असल्यामुळे या चित्रपटाला आणि परिणामी भारताला यंदाही ऑस्कर मिळवणे शक्य होणार नसल्याची भविष्यवाणी देखील कमालने केली आहे.
गल्ली बॉयच्या ऑस्करवारीवर कमाल खानची भविष्यवाणी
Film #GullyBoy has been selected as India’s official entry for the #Oscars2020! No doubt that it’s a good film but it’s copy of few English films. Means India can’t win #Oscar this year also. And we shouldn’t even try to win #Oscar. Why do we need to win #Oscar?
— KRK (@kamaalrkhan) September 21, 2019
नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बॉलिवूडमध्ये कमाल खान हा चर्चेत असतो, त्याने याहीवेळेस गल्ली बॉयवर निशाणा साधला. याशिवाय फिल्म फेअरसारखे नामांकित आपल्याकडे पुरस्कार असताना आपल्याला ऑस्करची काय गरज? आपण ऑस्कर मिळवण्याचा प्रयत्न तरी का करावा? अशा शब्दात कमाल खानने ट्विट मार्फत सवाल केला आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्याच्या या ट्विटनंतर आपल्या शैलीत त्याचा खरपूस समाचार देखील घेतला.
दरम्यान, गल्ली बॉय हा यंदाच्या ऑस्कर मध्ये ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म’ या पुरस्कारासाठी भारताची अधिकृत एंट्री आहे. झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ या चित्रपटात झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नांसाठी कष्ट घेणाऱ्या २६ वर्षीय ‘डिव्हाइन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख या प्रसिद्ध रॅपरची कथा दाखवण्यात आली आहे.