भारतातील दुसरा ताजमहाल- बीबी का मकबरा

tajmahal
दख्खनच्या पठाराच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला बीबी का मकबरा महाराष्ट्रातील औरंगाबादच्या जवळ आहे. ताजमहालाची दुय्यम प्रतिकृती म्हणून ओळखला जाणारा बीबी का मकबरा ताजमहालाच्या मानाने काहीसा दुर्लक्षित राहिला आहे. या मकबऱ्याच्या प्रवेशद्वारापाशी ‘आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ने उभारलेल्या फलकावर असलेल्या माहितीनुसार, हा मकबरा मोहम्मद आझमशाहा याने आपली आई दिलरास बानू बेगम हिच्या स्मरणार्थ बनविला असून, दिलरास बेगम औरंगजेबाची पत्नी होती. मात्र ही वास्तू १६६०-६१ साली बांधली गेल्याची असल्याची नोंद असून, त्याकाळी मोहम्मद आझमशाहा केवळ आठ वर्षांचा होता. मग त्याने ही वास्तू कशी बनवविली असा प्रश्न उभा राहतो.
tajmahal1
जिआन बॅप्टिस्ट टॅव्हरनियर नामक परदेशी पर्यटकाने करून ठेवलेल्या नोंदीच्या नुसार, या मकबऱ्याच्या बांधकामाला १६६३ साली सुरुवात झाली होती. औरंगजेबाची पत्नी त्याच्यासमवेत आग्र्याला गेली असता तिने नुकताच बांधून पूर्ण झालेला ताजमहाल पाहिला, आणि दख्खनमध्येही हुबेहूब अशीच वास्तू असावी अशी इच्छा प्रकट केली. त्यानंतर दिलरास बेगमचे १६६७ साली निधन झाले, आणि मरणोत्तर तिला राबिया-उद-दौरानी या नावाने संबोधित केले जाऊ लागले. त्याच काळामध्ये शाहाजहानच्या चारी मुलांमध्ये, शाहाजहाननंतर राज्य कोणी हाती घ्यायचे यावरून भयंकर भांडणे सुरु झाली. म्हणून दख्खनचा कारभार, आपला पुत्र आझमशाहा याच्या हवाली करून औरंगजेब आग्र्याच्या जवळ मुक्कामी राहिला. आझमशाहा कडे सर्व सूत्रे नावापुरतीच देण्यात आली असून, औरंगजेबाचे सर्व हालचालींवर बारीक लक्ष असे. पण मकबरा बांधला गेला तेव्हा सर्व सूत्रे नावापुरतीच का होईना, पण आझमशाहाच्या हातामध्ये असल्याने, हा मकबरा त्याने बांधाविल्याचा उल्लेख सापडतो.
tajmahal2
उत्तर भारतामध्ये मुघल कारकीर्दीमध्ये निर्माण केल्या गेलेल्या अनेक वास्तूंप्रमाणे बीबी का मकबरा ही वास्तू फार सुंदर, भव्य भासत नाही. शाहाजहानने जेव्हा ताजमहाल बनवविला, तेव्हा त्यासाठी त्याने प्रचंड संपत्ती खर्च केली. पण दख्खन प्रांतामध्ये असलेल्या औरंगजेबाला मात्र सातत्याने युद्धाला तोंड द्यावे लागत असल्याने त्याची बहुतेक सर्व संपत्ती त्यासाठी खर्च होत होती. शिवाय औरंगजेब त्याकाळी राजगादीवरही नव्हता. म्हणूनच भरमसाट संपत्ती खर्च न करता बीबी का मकबरा बनविला गेला.
tajmahal3
आज ही वास्तू काहीशी दुर्लक्षित असली, तरी दिमाखात उभी आहे. १५,००० चौरस फुटांच्या जागेमध्ये हा मकबरा उभा असून, चारबागच्या मधोमध हा मकबरा उभा आहे. या मकबऱ्यामध्ये संगमरावराचा सढळ हस्ते वापर केला गेला असून, मकबऱ्याच्या वरच्या मजल्यावर अतिशय सुंदर कोरीवकाम असलेल्या संगमरवरी जाळ्या असलेले झरोके आहेत. याच वरच्या मजल्यावरून राबिया-उद-दौरानीचे, रेशमी आच्छादनाने झाकलेले समाधीस्थळ पाहता येते.
tajmahal4
मुघल आणि दख्खनी या दोन्ही वास्तूशैलींचा प्रभाव या वास्तूवर पहावयास मिळतो. ताजमहालचे मुख्य स्थापत्यविशारद उस्ताद अहमद लाहोरी यांचे पुत्र आत्ताउल्ला रशीद यांनी केलेल्या स्थापत्यरचनेनुसार बीबी का मकबराची उभारणी करण्यात आली होती.

Leave a Comment