‘हे’ अलिशान हॉटेल आहे चक्क मिठापासून बनविलेले

salt-hotel
बोलिव्हिया देशातील उयुनी स़ॉल्ट फ्लॅटस् हा येथील खाऱ्या ‘फ्लॅटस्’ करिता प्रसिद्ध आहे. येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या मीठ या क्षाराचा उपयोग करून येथे ‘पलासियो दे साल’ नामक हॉटेल बनविण्यात येऊन, हे हॉटेल संपूर्णपणे मिठाचे बनलेले आहे. या हॉटेलच्या भिंती देखील मिठाने बनलेल्या असून, जमिनीपासून ते हॉटेलच्या छतापर्यंत सर्व काही मिठाने बनलेले आहे.
salt-hotel1
या हॉटेलमध्ये असलेले फर्निचर, ठिकठिकाणी ठेवलेली सुंदर शिल्पे आणि अनेक मनमोहक शोभेच्या वस्तू ही या ठिकाणी मिठापासूनच तयार करण्यात आल्या आहेत. या हॉटेलच्या मिठाच्या भिंती किंवा येथील इतर वस्तू नखांनी उकरून काढण्याला व या भिंती किती खारट आहेत हे चाखून पाहण्यास मात्र मनाई आहे. अश्या नाविन्यपूर्ण पद्धतीने बनविले गेलेले बोलिव्हियातील हे अनोखे हॉटेल आहे.
salt-hotel2
उयुनी सॉल्ट फ्लॅटस् मध्ये मिठाने बनविले गेलेले हे पहिलेच हॉटेल नाही. या पूर्वी याच सॉल्ट फ्लॅटस् च्या मधोमध आणखी एक हॉटेल मिठाने बनविण्यात आले होते. हे हॉटेल १९९३ साली बांधण्यात आले असून, सुरुवातीला हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले होते.
salt-hotel3
या हॉटेलमध्ये १२ डबल रूम्स होत्या, मात्र हे हॉटेल वाळवंटाच्या अगदी मध्यभागी बांधले गेले असल्याने येथे स्नानाची अथवा इतर कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरविणे अशक्य झाले होते. तसेच हॉटेलमधल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली न गेल्यामुळे येथे काहीच काळामध्ये अस्वच्छता पसरली होती. त्याचमुळे २००२ साली हे हॉटेल बंद करविण्यात आले होते.
salt-hotel4
हॉटेल ‘पलासियो दे साल’चे निर्माण २००७ साली करविण्यात आले असून, हे आधीच्या हॉटेलच्या ठिकाणी बांधलेले नाही. हे हॉटेल उयुनी शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असून, बोलिव्हियाची राजधानी पाझ पासून हे हॉटेल सुमारे ३५० किलोमीटर अंतरावर आहे. हे हॉटेल सरकारी नियमांच्या अनुसार बांधले गेले असून, पर्यटकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या हॉटेलमध्ये एक ड्राय सौना, स्टीम रूम, खाऱ्या पाण्याचा एक जलतरणतलाव आणि ‘व्हर्लपूल बाथ्स’ ची व्यवस्था आहे.

Leave a Comment