बर्लिनच्या प्राचीन वस्तूसंग्रहालयामधून गायब झालेल्या सुवर्णमुद्रेचा अजूनही थांगपत्ता नाही

coin
बर्लिनचे निवासी असणाऱ्या तिघाजणांच्या विरुद्ध दाखल केलेल्या खटल्याच्या कारवाईला सुरुवात होत असून, या तिघांच्या विरुद्ध बर्लिन येथील ‘बोड म्युझियम’ मध्ये धाडसी दरोडा घालून तेथून ‘बिग मेपल लीफ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुवर्णमुद्रेच्या चोरीचा आरोप आहे. ही सुवर्णमुद्रा तब्बल शंभर किलो वजनाची असून, याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किंमत सुमारे ४.३ मिलियन डॉलर्स इतकी सांगितली जात आहे.
ही सुवर्णमुद्रा मूळची कॅनडाची असून, २०१७ साली मार्चमध्ये या वस्तूसंग्रहालयावर पडलेल्या दरोड्यामध्ये ही सुवर्णमुद्रा चोरीला गेली होती. त्यानंतर पुष्कळ तपास करूनही या सुवर्णमुद्रेचा कोणताही मागमूस लागू शकलेला नाही. विशेष गोष्ट अशी, की जर्मनी देशाच्या राजधानीमध्ये असलेले हे ‘बोड’ वस्तूसंग्रहालय, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल याच्या निवासस्थानापासून अगदी थोड्याच अंतरावर असल्याने या सर्व परिसरामध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्था असते. वस्तूसंग्रहालयातून इतकी वजनदार सुवर्णमुद्रा काढून घेऊन त्याचे तुकडे करून ते इतरत्र पाठविले गेले असल्याची शक्यताही तपासअधिकाऱ्यांनी विचारात घेतली आहे.
coin1
या सुवर्णमुद्रेचे तुकडे करून ते देशाच्या बाहेर पाठविले गेले असल्याच्या शक्यतेचाही विचार केला जात आहे. मार्चमध्ये वस्तूसंग्रहालयामधून ही सुवर्णमुद्रा चोरली असल्याच्या आरोपावरून तीन इसमांना त्याच वर्षी जुलै महिन्यामध्ये अटक करण्यात आली होती. अहमद, वायसी, व विसम अशी या इसमांची नावे आहेत. या तिघांच्या विरुद्ध पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्याची कारवाई सुरु होत असून, जर या तिघांविरुद्ध चोरीचा गुन्हा सिद्ध झाला, तर तिघांनाही दहा वर्षांसाठी गजाआड व्हावे लागणार आहे. या तिघांच्या टोळीमध्ये वीस वर्षीय डेनिसचा ही समावेश असून, डेनिस या वस्तूसंग्रहालयामध्ये सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत होता. याने सुरक्षाव्यवस्थेबद्दल दिलेल्या सर्व माहितीवरून या चोरीचे नियोजन करणे आरोपींना शक्य झाले असल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment