वारंवार स्मार्टफोन बदलण्याची गरजच काय?


स्मार्टफोन…जगातील कोट्यवधी लोकांच्या दृष्टीने जीवनाचा अविभाज्य भाग. दैनंदिन व्यवहारांची एक अपरिहार्य गरज. त्यामुळेच स्मार्टफोन हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे साधन बनले आहे, यात काही नवल नाही. आपल्या खिशात मावणाऱ्या या इवल्याशा संगणकाने बहुतांश लोकांना जे काही हवे आहे ते मिळवून देण्यास हातभार लावला आहे. तेही काही मोजक्या क्लिोकद्वारे.

स्मार्टफोन हा शब्द पश्चिमेत वापरायला सुरूवात झाली 1995 मध्ये, परंतु खऱ्या अर्थाने स्मार्टफोन बनला तो 1992 साली. आयबीएम या जगप्रसिद्ध कंपनीने हा फोन बनवला होता आणि त्याचे नाव सिमॉन पर्सनल कम्युनिकेटर हे होते. अॅप्पलने आयफोन बाजारात आणण्याच्या 15 वर्षे आधीची ही गोष्ट आहे. त्यानंतर ब्लॅकबेरी आणि पामटॉप नावाचे पॉकेट पीसी मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले. मात्र त्यांचा वापर केवळ व्यावसायिकांसाठी मर्यादित होता. ही सुरुवातीची स्मार्ट उपकरणे बोजड होती आणि ती मुख्यतः व्यावसायिक उत्पादकता आणि संवादाच्या उद्देशाने तयार करण्यात आली होती. अॅप्पलचा आयफोन आणि गुगलचा जी1 अँड्रॉईड फोन बाजारपेठेत दाखल झाले तेव्हा खऱ्या अर्थाने स्मार्टफोन प्रत्येक हातात पोचण्यास सुरूवात झाली.

ही गोष्ट साधारणतः 2007-08 मधील. त्यानंतर दशकभराच्या काळातच स्मार्टफोन हा बहुतेकांच्या जीवनाचा अत्यावश्यक भाग बनला. आज स्मार्टफोनने पछाडलेली एक संपूर्ण पिढी आपल्या अवतीभोवती वावरते आहे. बहुतांश लोक आपला बहुतांश वेळ स्मार्टफोनशी चिकटून असतात आणि त्यातही त्यांचा बराचसा वेळ मनोरंजन आणि सोशल मीडिया वापरण्यात खर्च होतो. तरीही एखाद्या व्यक्तीला स्मार्टफोनशिवाय24 तास घालवायला सांगितले तर त्यांची अवस्था काय होईल, याची आपण केवळ कल्पना करू शकतो.

या पछाडलेपणातूनच आपल्या स्मार्टफोनमध्ये वारंवार बदल करण्याची टूम निघाली. नवीन स्मार्टफोन हातात आला, की त्यातील बहुतांश फीचर ओळखीचे होतात आणि तो जुना वाटू लागतो. त्यामुळे त्यात सुधारणा करण्याची (अपग्रेड) इच्छा होऊ लागते. त्यात मोठमोठ्या स्मार्टफोन कंपन्यांच्या स्पर्धेतून नवनवीन मॉडेल दाखल होऊ लागतात आणि मोठ्या आकाराचे, नवीन, चकचकीत मॉडेल आपल्याला भुरळ घालू लागतात. गळाला लागलेल्या माशांप्रमाणे आपण या मॉडेलच्या मागे धावू लागतो. प्रश्न हा आहे, का खरोखरच हजारो रुपये खर्चून अशा प्रकारे नवे फोन घेण्याची गरज आहे का? आपल्या फोनची परिस्थिती काय आहे, यावर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे.

दुर्दैवाने आपल्यापैकी बहुतांश लोक मार्केटिंगच्या मायाजालात अडकतात. हे मायाजाल त्यांना सांगते, की त्यांच्याकडे ‘लेटेस्ट’ मॉडेलचा फोन असेल तर जीवन अधिक वेगवान, चांगले आणि अधिक मजेदार बनेल. मात्र एकदा का हे मॉडेल हातात आले, की जुन्या चकचकीत हँडसेटपेक्षा ही वस्तू फारशी वेगळी नसल्याचे त्यांच्या लगेच लक्षात येते.

मोबाईलच्या प्रत्येक नव्या मॉडेलमध्ये काही सुधारणा निश्चितच असतात. त्याबाबत काही वाद नाही. परंतु मोबाईलची एकूण कामगिरी आणि उपयोग पाहिले, तर या सुधारणा अत्यंत मामुली असतात. त्यासाठी हजारो रुपये खर्चण्याची काहीही गरज नसते. ज्यांचे स्मार्टफोन 3 वर्षांपेक्षाही कमी जुने आहेत त्यांना खरोखरच आपले स्मार्टफोन अपग्रेड करण्याची काहीही आवश्यकता नाही. भारतीय ग्राहकांचीही मानसिकता हीच आहे. काऊंटरपॉईंट रिसर्च या कंपनीच्या अहवालानुसार, भारतीय ग्राहक दर 25 महिन्यांनी स्मार्टफोन बदलतात. यात 20,000 रुपयांपेक्षा अधिक किमतीचे स्मार्टफोन वापरणाऱ्यांचा समावेश आहे.

सतत स्मार्टफोन बदलणाऱ्यांपैकी अनेक जण तसे करतात त्यामागे काही कारणे असतात. ते एकतर त्यांच्या सध्याच्या स्मार्टफोनला कंटाळलेले असतात किंवा लेटेस्ट मॉडेल हातात असलेल्यांच्या गर्दीत आपण एकटे पडू नये, असे त्यांना वाटत असते. उदाहरणार्थ, ग्राहकांना ‘स्वप्नांचे, वैयक्तिक अनुभवांचे आणि स्टेट्सचे एक जागतिक पॅकेज’ विकणे हे अॅप्पलचे धोरण आहे. त्यानुसार अॅप्पलची प्रतिमा इतकी जोरदार आहे, की फोनवर अॅप्पलचा लोगो नसेल तर तो फोन कोणत्या कंपनीचा आहे हे लोक लक्षातही घेत नाहीत. त्यामुळे महागडे आयफोन हातात असणे हा अनेकांच्या दृष्टीने एक ध्यास बनतो.

नवीन चकचकीत मॉडेल आकर्षक असतात आणि त्यांच्यावर उधळण्यासाठी तुमच्याकडे पैसे असतील, तर खुशाल वारंवार बदला. मात्र आपले पैसे जपून वापरायचे असतील तर तुम्ही आणखी काही काळ वाट पाहू शकता. गेल्या वर्षीचा स्मार्टफोन वापरण्यात कसलीही लाज बाळगायची गरज नाही.

Leave a Comment