तुम्ही कधीही पाहिला नसेल असा रनआऊट


क्रिकेट हा खेळ बेभरवशी खेळ आहे, हे काय आपल्याला नवीन सांगायची गरज नाही. त्यातच क्रिकेटमध्ये अनेक नवीन गोष्टी आणि विक्रम हे होतच असतात. अनेकविध प्रकारे फलंदाज बाद होत असतात. फलंदाज एखाद्या चांगल्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर बाद होतो, तर कधी उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे फलंदाजाला माघारी परतावे लागते. पण सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच प्रकारच्या रनआऊटचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे. खेळात फलंदाजाचे लक्ष नसल्याने तो रनआऊट झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मार्क कॉसग्रोव्ह याचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. मार्क या व्हिडीओमध्ये ज्या प्रकारे रनआऊट झाला आहे, ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. क्रॉसग्रोव्ह इंग्लंड काऊंटी क्रिकेटच्या डिव्हिजन २ मध्ये लिस्टरशायर आणि ग्लॅमॉर्गन यांच्यात झालेल्या सामन्यात फलंदाजी करत होता. पहिल्या डावात खाते न उघडता तो शून्यावर बाद झाला होता. तो दुसऱ्या डावात खेळताना मजेशीर पध्दतीने बाद झाला.


या व्हिडीओत कॉसग्रोव्ह याने चेंडू फलंदाजाच्या अगदी जवळ असलेल्या फॉरवर्ड शॉर्ट लेगवरील क्षेत्ररक्षकाकडे टोलवला. चेंडू त्या क्षेत्ररक्षकाने आडवला. पण खेळाकडे थोडेसे दुर्लक्ष झालेल्या त्या फलंदाजाने त्यातही धाव घेण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षकाच्या हातातच चेंडू होता, त्याने तरीही धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात तो रनआऊट झाला. या आधीदेखील कॉसग्रोव्हचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. कॉसग्रोव्हने यात चेंडूला डोक्याने स्लिपमध्ये शॉट मारला होता.

Leave a Comment