राधेच्या मृत्युनंतर का तोडली श्रीकृष्णाने बासरी? जाणून घेऊ या रोचक आख्यायिका

radha-krishna
श्रीकृष्णाला बासरी अतिशय प्रिय आहे हे आपल्याला ठाऊक आहेच. पण हीच प्रिय बासरी कृष्णाने राधेच्या मृत्युनंतर तोडून टाकली. राधा आणि बासरी श्रीकृष्णाला अतिप्रिय होत्या. त्यामुळे एकीच्या मृत्युनंतर दुसरीचे अस्तित्व श्रीकृष्णाने नष्ट केल्याचे म्हटले जाते. या बाबतीत एक अतिशय रोचक आख्यायिका आहे. राधा आणि श्रीकृष्ण पहिल्यांदा वेगळे झाले, ते कंसाने बलराम आणि कृष्णाला मथुरेला येण्यासाठी आमंत्रण दिल्यानंतर. मथुरेला जाण्याआधी कृष्णाने राधेचा निरोप घेत लवकरच परतण्याचे वचन दिले. पण श्रीकृष्ण लवकर परतले नाहीत आणि काही काळानंतर त्यांनी रुक्मिणीशी विवाह देखील केला.
radha-krishna1
श्रीकृष्णाने वृंदावन सोडल्यानंतरच्या काळाचे वर्णन करणाऱ्या वान्ग्मयामध्ये राधेचे वर्णन कमीच सापडते. मथुरेला गेल्यानंतर कंस आणि त्याच्या राज्याचा नायनाट करून कृष्ण द्वारकेला आले आणि तिथे त्यांनी राज्य स्थापन केले. कृष्ण वृन्दावनातून निघून गेल्यानंतर राधाचे आयुष्य देखील बदलून गेले. त्यानंतर यादव वंशातील एकाशी राधेचा विवाह झाल्याचे म्हणण्यात येते. राधेने दाम्पत्यजीवनाच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्या, तरीही मनाने तिने स्वतःला कृष्णालाच समर्पित केले होते. अखेरीस जीवनातील सर्व कर्तव्ये निष्ठेने पार पाडल्यानंतर वृद्ध झालेली राधा श्रीकृष्णाला भेटण्यास गेली. श्रीकृष्णाने रुक्मिणी आणि सत्यभामेशी विवाह केल्याचे कळल्यानन्तरही राधा अजिबात कष्टी झाली नाही.
radha-krishna2
राधेच्या भेटीने श्रीकृष्णाला अतिशय आनंद झाला. सांकेतिक भाषेमध्ये दोघांनी एकमेकांशी खूप वेळ वार्तालाप केला. राधा द्वारकेमध्ये आगंतुक असल्याने तिला ओळखणारे तिथे कोणीच नव्हते. याच संधीचा लाभ घेत कृष्णाने राजमहालात सेविका म्हणून राधेला ठेऊन घेतले. राधा त्यानंतर राजमहालामध्ये राहून तेथील दैनंदिन कामकाज पाहू लागली. संधी मिळताच कृष्णाची भेटही घेऊ लागली. मात्र पूर्वी कृष्णाच्या संगतीत जो आध्यात्मिक आनंद तिला मिळत असे, तो तिला आता मिळेनासा झाला. त्यामुळे राजमहालातून निघून श्रीकृष्णापासून दूर जाण्याचा राधेने मनोमन निश्चय केला.
radha-krishna3
ठरविल्या प्रमाणे राधा राजमहालातून बाहेर पडली आणि एकाकी जीवन कंठू लागली. पण कालांतराने ती अगदी एकटी पडली. वाढत्या वयामुळे तिचे शरीरही थकले. त्यावेळी श्रीकृष्णाची गरज तिला भासू लागली. तिची इच्छा ओळखून कृष्ण राधेची भेट घेण्यास आले. त्यावेळी राधेने, तिला श्रीकृष्णाची बासरी ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णाने बासरीवर अतिशय मधुर संगीत वाजविण्यास सुरुवात केली. दिवस उलटले, रात्री निघून गेल्या, तरी श्रीकृष्णाचे बासरीवादन सुरु राहिले. अखेरीस या मधुर संगीतामध्ये एकरूप होऊन गेलेल्या अवस्थेतच राधेने देहत्याग केला. राधेच्या मृत्यूने श्रीकृष्णाला मोठा मानसिक धक्का बसला. त्यामुळे त्यांच्या आणि राधेच्या प्रेमाचे प्रतीक असलेली बासरी त्यांनी दु:खावेगाने तोडून टाकली, अशी आख्यायिका आहे.

Leave a Comment