आरजे मलिष्काचे ‘चांद जमीन पर’ हे गाणे एकदा पाहाच!


मुंबईतील रस्त्यांची अवस्था पावसाळा आला की पाहण्यासारखी होत असते. नागरिकांचे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अगदी हाल होतात. याकडे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सुप्रसिद्ध आरजे मलिष्का ही पुन्हा परतली आहे. तिने रस्त्यांवरील खड्ड्यांना थेट चंद्राची उपमा देत उपरोधिक नवे गाणे तयार केले आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या या गाण्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

आरजे मलिष्का मागच्या वर्षी देखील बीएमसीवर आधारित ‘सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय’, या गाण्याने चर्चेत आली होती. तिचे हे गाणेदेखील प्रचंड गाजले होते. तिने सोशल मीडियावर आता आणखी एक व्हिडिओ शेअर करुन मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यांकडे लक्ष वेधले आहे.

या व्हिडिओची सुरुवात ‘हम तो चांदपर चले गये मगर चांद खुद जमीन पर आया है’ या वाक्याने होते. त्यानंतर या गाण्यात मलिष्काचा हटके अंदाजही पाहायला मिळतो. ज्याप्रमाणे चंद्रावर खड्डे पडलेले आहेत. अगदी तशाच प्रकारचे खड्डे आमच्या मुंबईच्या रस्त्यावर देखील आहेत, या व्हिडिओतून असेच तिने दाखवले आहे.

तिने यापूर्वीदेखील ‘मुंबई गेली खड्ड्यात’, हे गाणे तयार केले होते. रस्त्यांवरील खड्ड्यावरच हे गाणेदेखील आधारित होते. अलिकडेच बंगळुरुच्याही एका युवकाने रस्त्यावरील खड्ड्यावर एक व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. त्याने अंतराळवीराचा वेष परिधान करुन रस्त्यावर चंद्रावर गेल्याप्रमाणे व्हिडिओ शूट केला होता. आपल्या अनोख्या गाण्यांमुळे मलिष्का नेहमीच चर्चेत असते. आता तिच्या या व्हिडिओवर देखील नेटकरी भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Comment