अस्सल देशी चंपी आणि शँपू परदेशामध्ये पोहोचविणारे शेख दीन मोहम्मद

Shampoo
केसांसाठी निरनिराळी रासायनिक प्रसाधने वापरण्यापेक्षा, संपूर्णपणे नैसर्गिक औषधी वापरून बनविलेले शँपू आणि तेल यांचा वापर भारतामध्ये प्राचीन काळापासून होत आहे. मात्र एकोणिसाव्या शतकामध्ये या वस्तू परदेशापर्यंत कशा पोहोचल्या आणि लोकप्रिय झाल्या, याची कहाणी अतिशय रोचक आहे. आणि विशेष गोष्ट अशी, की या वस्तूंना परदेशात प्रसिद्धी मिळवून दिली एका भारतीयाने. मात्र या भारतीयाविषयी फारशी माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली पहावयास मिळत नाही. अठराव्या शतकामध्ये शेख दीन मोहम्मद हे भारतामधून इंग्लंड येथे स्थलांतरित होणाऱ्या भारतीयांपैकी असून, तिथे स्थायिक होऊन त्यांनी स्वतःचे रेस्टॉरंट सुरु केलेच, पण त्याही शिवाय अस्सल देशी शँपूचा आणि ‘चंपी’चा परिचय जगाला करून देण्याचे श्रेयही त्यांचेच आहे.

शेख दीन मोहम्मद यांचा जन्म १७५९ साली पटना येथे झाला. त्या काळी पटना बंगालच्या नवाबांच्या अधिपत्याखाली होते. मोहम्मद यांचे वडील न्हावी समाजातील असून, १७५७ सालच्या प्लासीच्या युद्धानंतर आपले आधिपत्य बंगाल प्रांतावर स्थापित करण्यास सुरुवात करीत असलेल्या ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीचे, ते चाकर होते. निरनिरळ्या औषधी वनस्पती वापरून केसांसाठी तेले, साबण आणि केस धुण्यासाठी वापरण्यात येणारे द्रव बनविण्याची कला मोहम्मद यांनी आपल्या वडिलांकडून शिकून घेतली. मोहम्मद दहा वर्षांचे असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले, त्या वेळी लहानग्या मोहम्मदच्या पालनपोषणाची जबाबदारी कॅप्टन गॉडफ्री बेकर नामक ब्रिटीश सैन्य अधिकाऱ्याने घेतली. १७८४ कॅप्टन बेकर जेव्हा नोकरीतून राजीनामा देऊन मायदेशी, आयर्लंड येथे परतले, तेव्हा पंचवीस वर्षीय मोहम्मदही त्यांच्याबरोबर गेले.
Shampoo1
आयर्लंडमधील कॉर्क येथे राहून मोहम्मद उच्चशिक्षण घेत असताना त्यांचा परिचय जेन डेली नामक तरुणीशी झाला. परिचयाचे रूपांतर प्रेमात झाले, आणि या दोघांनी लग्न केले. या दोघांचे धर्म निराळे असल्याने सुरुवातीला यांना समाजाचा पुष्कळ विरोध सहन करावा लागला, पण कालांतराने सर्व काही सुरळीत होऊन मोहम्मद आणि जेन समाधानाचे दाम्पत्यजीवन जगू लागले. १७९३ साली मोहम्मद यांनी ‘द ट्रॅव्हल्स ऑफ दीन मोहम्मद’ नावाने पुस्तक लिहिले. या पुस्तकामध्ये मोहम्मद यांनी भारतातील अनेक शहरांची वर्णने लिहिली आहेत. प्रथमच एका भारतीयाने इंग्रजी भाषेमध्ये लिहलेले पुस्तक म्हणून या पुस्तकाला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

१८०७ साली मोहम्मद त्यांच्या परिवारासोबत आयर्लंडमधून इंग्लंडला आले. येथे एका ‘स्टीम बाथ’ (स्पा) मध्ये काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. याच ठिकाणी त्यांनी लहानपणी आत्मसात केलेले कौशल्य उपयोगात आणले, व निरनिराळ्या तेलांचा आणि साबणांचा वापर करीत ‘चॅम्पो’ करण्याची पद्धत अस्तित्वात आणली. हीच पद्धत पुढे ‘शँपूइंग'(shampoo-ing) म्हणून प्रसिद्ध झाली, आणि मोहम्मद यांचे नाव होऊ लागले. मात्र मोहम्मद एवढ्यावर समाधानी नव्हते. काही तरी वेगळे करण्याची इच्छा असलेल्या मोहम्मदने १८१० साली स्वतःचे रेस्टॉरंट सुरु केले. ‘हिंदोस्तानी कॉफी हाऊस’ असे नाव असलेले हे रेस्टॉरंट एका भारतीयाने लंडनमध्ये सुरु केलेले पहिले रेस्टॉरंट ठरले. या ठिकाणी उत्तमोत्तम चविष्ट भारतीय खाद्यपदार्थ, तसेच उत्तम मद्याच्या सोबतच हुक्का आणि चिलीमही पुरविण्यात येत असे. त्याकाळी येथील खाद्यपदार्थ ग्राहकाच्या घरी पोहोचविणारे, म्हणजेच भोजनाची ‘होम डिलिव्हरी’ करणारेही हे एकमेव रेस्टॉरंट होते. मात्र त्या काळी घराच्या बाहेर पडून एखाद्या रेस्टॉरंटमध्ये भोजन घेण्याची प्रथा फारशी चलनात नसल्याने मोहम्मदचे रेस्टॉरंट फार काळ चालू शकले नाही.

त्यानंतर मोहम्मद लंडन शहर सोडून आपल्या परिवारासमवेत ब्रायटन येथे राहण्यास आले. आपल्या वडिलांकडून आत्मसात केलेले कौशल्य उपयोगात आणून मोहम्मदने ‘मोहम्मद बाथ्स्’ नावाने स्पा सुरु करून या ठिकाणी ‘इंडियन मेडिकेटेड व्हेपर बाथ’, म्हणजेच निरनिराळ्या औषधी आणि तेले वापरून स्टीम बाथ उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. आजवरच्या मोहम्मद यांच्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये हा व्यवसाय सर्वोत्तम ठरला. त्यांच्या या स्पाला खूप लोकप्रियता लाभली. पाहता पाहता मोहम्मद यांच्या देशी शँपू व चंपीची ख्याती इंग्लंडच्या राजदरबारी जाऊन पोहोचली आणि राजे जॉर्ज (चौथे) व राजे विलियम (चौथे) सारख्या अनेक बड्या हस्तींचा समावेश मोहम्मद यांच्या नियमित ग्राहकांमध्ये झाला. त्यानंतर मोहम्मद यांना ‘रॉयल शँपूइंग सर्जन’ अशी उपाधी दिली जाऊन,’डॉक्टर ब्रायटन’ या नावानेही लोक त्यांना ओळखू लागले.

Leave a Comment