भगवान विष्णूंकडे सुदर्शन चक्र कसे आले? जाणून घेऊया याची कथा

god
वैदिक काळापासूनच भगवान विष्णूंना संपूर्ण विश्वाची सर्वोच्च शक्ती मानले जात आले आहे. पुराणांमध्ये विष्णूंचा उल्लेख सृष्टीचे पालनहार असा करण्यात आला आहे. भगवान विष्णू चतुर्हस्त असून त्यांनी एका हातामध्ये पद्म, म्हणजेच कमल, एका हातामध्ये कौमोदकी (गदा), एका हातामध्ये शंख आणि एका हातामध्ये सुदर्शन चक्र धारण केलेले असते. भगवान विष्णूंच्या हातामध्ये हे सुदर्शन चक्र कसे आले, यामागे एक रोचक कथा आहे.
god4
भगवान विष्णूंचे पूर्ण रूप कुठल्या ना कुठल्या गोष्टीचे प्रतीक आहे. उदाहरण द्यायचे झाले, तर भगवान विष्णू धारण करीत असलेल्या आभूषणांना पुराणांमध्ये अस्त्र-शस्त्रांचे प्रतीक मानले गेले आहे. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचे चार हस्त मानवी जीवनातील चार महत्वाची उद्दिष्ट, म्हणजेच जीवनातील चार आश्रम दर्शवितात. एक हात ज्ञानसंपादन, दुसरा हात पारिवारिक जीवन, तिसरा हात वानप्रस्थ आणि चौथा हात संन्यास दर्शवितो. विष्णूंच्या कानांतील कुंडले, सुख-दु:ख, ज्ञान-अज्ञान इत्यादी विपरीत गोष्टींची जोडी दर्शवितात. भगवान विष्णूंच्या मुकुटावर असलेले मोरपीस त्यांच्या कृष्णावताराचे प्रतीक असून, त्यांनी हाती धारण केलेले सुदर्शन चक्र सात्विक भावाचे प्रतीक आहे.
god3
भगवान विष्णूंच्या हाती सुदर्शन चक्र कसे आले, याबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते. एकदा कार्तिक शुक्ल चतुर्दशीच्या वेळी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी विष्णू काशीला आले असता, माणिकर्णिका घाटावर स्नान करून त्यांनी भगवान शिवाला एक हजार सुवर्णकमले अर्पण करून त्यांची पूजा करण्याचा संकल्प केला.
god2
अभिषेक झाल्यानंतर जेव्हा विष्णूंनी पूजेला आरंभ केला, तेव्हा त्यांच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी शिवांनी हजार कमलपुष्पांपैकी एक पुष्प कमी केले. विष्णुंना एक कमलपुष्प पमी पडत असल्याचे लक्षात आले, पण त्यांना त्यांचा संकल्प पूर्ण करायचा असल्याने त्या एका कमलाच्या ऐवजी भगवान विष्णू आपला डोळा त्यागण्यासाठी तयार झाले. विष्णूंचे डोळे कमलाप्रमाणे असून, त्यासाठीच त्यांना पुंडरीकाक्ष, कमलनयन म्हटले जाते. त्यामुळे पूजेसाठी कमी पडलेल्या एका कमळाच्या ऐवजी आपला कमलरूपी डोळा देण्यास विष्णू तयार झाले.
god1
त्यांच्या या भक्तीने प्रसन्न होऊन शिव विष्णूंच्या समोर अवतरले आणि भगवान विष्णूंनी ही पूजा केलेला दिवस अतिशय पुण्य देणारा ठरून, ‘वैकुंठ चतुर्दशी’ म्हणून ओळ्खला जाईल असा आशिर्वाद दिला. तसेच या दिवशी जो कोणी अतिशय भक्तिभावाने व्रतपूर्वक शिवाचे पूजन करेल, त्याला मोक्ष प्राप्ती होईल असा ही आशिर्वाद शिवांनी दिला.
god5
विष्णुंची अपार भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शिवांनी त्यांना सुदर्शन चक्र दिले, आणि जगातील दुष्ट शक्तींचा नाश करण्याची ताकद या चक्रामध्ये असेल असा आशिर्वादही दिला. तेव्हापासून भगवान विष्णूंच्या एका हाताच्या तर्जनीमध्ये सुदर्शन चक्र धारण केले गेले अशी ही कथा आहे.