जपानमधील ही व्हेंडिंग मशीन्स पुरवितात चक्क किड्यांचा खाऊ !

japan
नाकतोडे, टॅरेंट्युला नामक कोळी, आणि युनिकॉर्न बीटल्स नामक किडे असा खाऊ जर तुम्हाला आवडत असेल, तर तो पुरविणारी व्हेंडिंग मशीन्स आता जपान मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच या व्हेंडिंग मशीन्समार्फत उपलब्ध करून दिला जाणारा हा खास ‘खाऊ’ झपाट्याने लोकप्रिय होत असलेला पहावयास मिळत आहे. काही तरी नवीन खाऊन पाहण्याची इच्छा आणि सामान्यपणे रेस्टॉरंटमध्ये मिळणारे पदार्थ, व्हेंडिंग मशीन्समधून पुरविले जाण्याबद्दलचे कुतुहल, यामुळेच किड्यांचा खाऊ पुरविणारी ही व्हेंडिंग मशीन्स सध्या लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत.

जगभरामध्ये सातत्याने लोकसंख्या वाढत असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर अन्नपुरवठा करण्यासाठी आता अन्नपदार्थांमध्ये भाज्या, फळे, प्राणीजन्य पदार्थ यांच्यासोबत निरनिराळ्या किड्यांचा समावेशही केला जात असून, येत्या काही वर्षांमध्ये हे किडे आपल्या आहाराचा महत्वाचा भाग बनणार असल्याचे भाकित, तज्ञ काही काळापासून करीत आहेत. या पार्श्वभूमीवर जपानमधील चौतीस वर्षीय तोशीयुकी टोमोडा यांनी या किडे पुरविणाऱ्या व्हेंडिंग मशीन्सची कल्पना विकसित केली आहे. सामान्य अन्नपदार्थांना पर्याय म्हणून टोमोडा यांनी स्वतः वेगवेगळ्या किड्यांचे सेवन केले असून, या किड्यांचा वापर करून बनविलेले पदार्थ विकण्यासाठी व्हेंडिंग मशीन्स, टोमोडा यांनी गेल्या वर्षी विकसित केली.

या व्हेंडिंग मशीन्समध्ये दहा प्रकारचे ‘स्नॅक्स’ उपलब्ध असून, यातील सर्वात स्वस्त पदार्थ प्रोटीन बार आहे. हा प्रोटीन बार नाकतोड्यांच्या पावडर पासून बनविला गेला असून, याची किंमत ७०० येन (६.४५ डॉलर्स) आहे. व्हेंडिंग मशीन पुरवित असलेला सर्वात महाग पदार्थ ‘सॉल्टेड क्रिकेटस्’ असून, याच्या एका पॅकेटची किंमत १३०० येन आहे. तसेच ‘कॅन्ड टॅरेंट्युला’ १९०० येनमध्ये उपलब्ध आहेत.

Leave a Comment