लहान मुलांमध्ये किडनी कर्करोगाची ‘ही’ आहेत लक्षणे व कारणे

kidney
या वर्षाच्या सुरुवातीला अभिनेता इम्रान हाश्मी याने त्याचा मुलगा अयान हा कर्करोगमुक्त झाल्याची आनंदी वार्ता सर्वांना दिली. २०१४ साली लहानग्या अयानला रीनल कॅन्सर, म्हणजेच किडनीचा कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले होते. त्यावेळी अयानचे वय केवळ तीन वर्षे सहा महिने इतकेच होते. अधिक तपासण्या केल्या गेल्या असता, अयानच्या किडनीमध्ये मोठा ट्युमर आढळून आला होता. त्यानंतर सर्जरी व केमोथेरपी केली गेल्यानंतर आणि गेली पाच वर्षे सातत्याने अयानला निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर आता तो कर्करोगातून संपूर्णपणे मुक्त झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे.
kidney1
रीनल कॅन्सर हा लहान मुलांमध्ये अतिशय अभावानेच आढळणारा असून, ज्या लहान मुलांमध्ये हा विकार उद्भविला आहे, त्यातील ७५ % मुलांचे वय पाच वर्षांच्या आतील होते. पण महत्वाची गोष्ट अशी, की या प्रकारच्या कॅन्सरचे निदान वेळेवर झाल्यास योग्य उपचारांनी हा संपूर्ण बरा होतो. या कॅन्सरची काही निश्चित लक्षणे लहान मुलांच्या शरीरामध्ये दिसून येतात. लहान मुलाच्या पोटामध्ये गाठ जाणविणे हे प्राथमिक लक्षण आहे. त्याचसोबत सतत ताप येणे, लघवीतून रक्त पडणे, सातत्याने पोट दुखणे, अचानक वजन घटू लागणे, भूक न लागणे, आणि शौचास त्रास होणे अशी काही लक्षणे रीनल कॅन्सर असल्याचे दर्शवितात.
kidney2
रीनल कॅन्सर होण्यामागची निश्चित कारणे सांगणे कठीण असले, तरी काही प्रमाणात हा आजार अनुवांशिक असल्याचे तज्ञ म्हणतात. तसेच शरीराच्या क्रोमोसोम्समध्ये झालेल्या विशिष्ट बदलांमुळेही हा कॅन्सर उद्भवू शकतो. या कॅन्सरचे निदान योग्य वेळी झाले तर केमोथेरपी आणि सर्जरीच्या मदतीने यावर उपचार करणे शक्य होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment