या नव्या फॅशन ट्रेंड्स तुमच्यासाठी अपायकारक तर नाहीत?

sou
नव्या फॅशनबरहुकुम आपला पेहराव असावा असा आपल्या सर्वांचाच प्रयत्न असतो. मात्र या फॅशन्सचा अंगिकार करताना यांपासून आपल्याला कोणत्या प्रकारचा अपाय तर होत नाही, याकडे लक्ष दिले जाणेही आवश्यक आहे. आजकाल महिलांसाठी निरनिराळ्या प्रकारच्या ‘हायहील्स’ चलनात आहेत. ही पादत्राणे अतिशय स्टायलिश दिसत असली, तरी यांच्या अतिवापराने मात्र पावलांना इजा होऊ शकते.
heels
हायहील्स सातत्याने परिधान केल्याने शरीराचा भार हा संपूर्ण पावलावर न पडता पावलाच्या पुढील भागावर अधिक पडतो. कालांतराने या भागामध्ये वेदना सुरु होऊ शकतात. तसेच पावलाच्या मध्य भागावर वारंवार ताण येऊन त्यावर हलकी सूज दिसून येऊ शकते. हायहील्सचा सतत वापर केल्याने गुडघेदुखी उद्भवू शकते. तसेच पाठ दुखणे, किंवा कंबरदुखी सारख्या समस्याही उद्भवू शकतात.
heels1
आजकाल निरनिरळ्या फॅशनचे पेहराव अतिशय चलनात आहेत. हे पेहराव बनविण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे कृत्रिम मटेरियल सर्रास वापरले जात असते. अक्रीलिक, रेयॉन, नायलॉन वापरून बनविलेले कपडे दिसायला आकर्षक दिसत असले, तरी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वापरण्यास त्रासदायक ठरू शकतात. हे कपडे कृत्रिम धाग्यांचा वापर करून बनविले जात असतात. उन्हाळ्यातील उष्ण, दमट हवेमध्ये अश्या प्रकारचे कपडे घातल्यास शरीरावरील घाम शोषला जाऊ शकत नाही, व त्यामुळे त्वचेवर पुरळ, किंवा तत्सम अॅलर्जी येण्याचा संभव असतो. त्यामुळे दैनंदिन कामासाठी पोशाख परिधान करताना फॅशनच्या सोबत तो कपडा आरामदायक आणि त्वचेसाठी योग्य आहे किंवा नाही याचा विचार करावा.
heels2
आजकाल ‘स्किनी’, म्हणजेच अंगाबरोबर घट्ट बसणारे कपडे परिधान करण्याची फॅशनही चलनात आहे. पण असे कपडे वारंवार, जास्त वेळ परिधान केल्याने त्यापासून अपाय संभवत असल्याचे तज्ञ म्हणतात. जास्त घट्ट कपडे परिधान केल्याने पाठीचे आणि पोटाचे स्नायू आवळले जाऊन त्यांमध्ये वेदना उद्भवू शकते. तसेच घट्ट कपडे वारंवार परिधान केल्याने त्वचेवर फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यताही अधिक असते. घट्ट कपड्यांमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होत नाही, आणि त्यामुळे क्वचित अंगाला मुंग्या येणे, हात किंवा पाय थंड पडून त्यामध्ये वेदना होणे या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
heels3
कपड्यांच्या सोबत आजकाल त्याबरोबर परिधान केल्या जाणाऱ्या आभूषणांमध्येही विविधता पहावयास मिळू लागली आहे. कानातील आभूषणे, गळ्यात परिधान करण्याची आभूषणे निरनिराळ्या पद्धतीने डिझाईन केली जात असतात. पण कानामध्ये घालण्याची आभूषणे खूप वजनदार असली, तर त्यामुळे कानाच्या भोकांचा आकार वाढण्याची शक्यता असते. अनेक महिलांच्या कानाची भोके इतकी मोठी होतात, की त्यावर वैद्यकीय पद्धतीने टाके घालण्याची देखील वेळ येते. म्हणूनच कानामध्ये घालण्याची आभूषणे फार जड नसतील याची काळजी घ्यावी.

Leave a Comment