संधिवात असल्यास आहारामध्ये हे पदार्थ टाळा

Arthritis
सांध्यांमध्ये सातत्याने सूज आणि वेदना हे संधिवाताचे लक्षण आहे. संधिवात निरनिराळ्या प्रकारचा असला, तरी याच्या उपचारपद्धतीमध्ये सांध्यांवरील सूज कमी करून वेदना शमविण्यावर लक्ष केंद्रित केले जात असते. आपल्या आहारामध्ये अनेक पदार्थ असे असतात, जे सांध्यांवरील सूज आणि पर्यायाने वेदना वाढविण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे ज्यांना संधिवाताचा त्रास आहे, त्यांनी आहारातून हे पदार्थ शक्यतो वर्ज्य करावेत आणि वर्ज्य करणे शक्य नसल्यास अतिशय मर्यादित प्रमाणामध्ये या पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ कोणते ते जाणून घेऊ या.
Arthritis1
अनेकांना दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये असलेल्या एका विशिष्ट प्रथिनामुळे सांधेदुखी होऊ लागते. अशा वेळी आहारातून दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाण कमी करून शरीराला आवश्यक असणारी प्रथिने देणारे इतर पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करावेत. यामध्ये डाळी, कडधान्ये, टोफू, पालेभाज्या, ‘किन्वा’सारखे धान्य यांचा समावेश करता येईल.
Arthritis6
ज्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते (विशेषतः प्रोसेस्ड अन्नपदार्थ) अशा अन्नपदार्थांचे सेवनही अतिशय मर्यादित असावे.
Arthritis5
चायनीज किंवा इतरही अन्य खाद्य पदार्थांमध्ये वापरले जाणरे मोनो सोडियम ग्लुटामेट, म्हणजेच अजिनोमोटोच्या सेवनाने संधिवात असलेल्यांच्या सांध्यांवर सूज वाढू शकते. त्यामुळे अजिनोमोटो असणारे अन्नपदार्थ आहारातून वर्ज्य करावेत. तसेच संधिवात असलेल्यांनी आहारामध्ये मिठाचे प्रमाणही कमी असेल याची काळजी घ्यावी.
Arthritis3
मद्यपान, धुम्रपान आणि तंबाखूसेवनाने देखील संधिवात बळावतो. सातत्याने तंबाखू सेवन करणाऱ्यांमध्ये किंवा धुम्रपान करणाऱ्यांमध्ये रह्युमटॉइड आर्थ्रायटीसचा धोका जास्त असतो. त्याचबरोबर संधिवात असणाऱ्यांनी अॅस्पारटेम युक्त कृत्रिम स्वीटनर्सचा ही वापर टाळावा.
Arthritis7
तसेच मैद्यापासून तयार केलेल्या अन्नपदार्थांचे सेवनही अतिशय मर्यादित असावे. त्याचप्रमाणे तळलेले, किंवा खूप जास्त तापमानावर शिजविलेले पदार्थही टाळले जावेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही