तुम्ही पाहिला आहे विराटने घेतलेला भन्नाट झेल


मोहाली – भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर ७ गडी राखून मात केली आहे. पावसामुळे ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रद्द करण्यात आला होता. भारताने मोहालीच्या मैदानावरील या विजयामुळे या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात विराटने नाबाद ७२ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा युवा गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत आफ्रिकेला १४९ धावांमध्ये रोखले.


फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघानेही चांगली फलंदाजी केली. कर्णधार क्विंटन डी कॉकने अर्धशतक झळकावत मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. भारतासाठी त्याची आक्रमक फलंदाजी धोकादायक ठरत होती. तेव्हा विराट कोहलीने १२व्या षटकामध्ये नवदीप सैनीच्या चेंडूवर हवेत उडी मारत डी कॉकचा अप्रतिम झेल घेतला. सेट फलंदाज डी कॉक बाद झाल्याने, आफ्रिकेचा संघ निर्धारीत २० षटकात १४९ धावा करु शकला.

दरम्यान, या मालिकेत आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमिवर युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण दुसऱ्या सामन्यात खराब क्षेत्ररक्षणामुळे विराट कोहली काही काळ संतापला होता. कोहलीचा हा रुद्रावतार पाहून मैदानावरील प्रेक्षकही अवाक झाले.

Leave a Comment