अमिताभ बच्चन यांच्या वक्तव्याला मनसेचे उत्तर


अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीबाबत वाद सुरू असतानाच मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे कौतुक केले. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काल मुंबई मेट्रो कारशेडसाठी आरे जंगलातील वृक्षतोडीला अप्रत्यक्ष समर्थन केल्यानंतर आज त्यांच्या वक्तव्याचा मनसेने विरोध केला आहे. 2010 मध्ये मेट्रोला विरोध करणारे अमिताभ बच्चन नवीन सरकार आल्यावर मेट्रोला कसे पाठिंबा देत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे असे म्हणत मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी कार्टून काढून सवाल उपस्थित केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये अमिताभ बच्चन म्हणाले होते, तात्काळ माझ्या एका मित्राला दवाखान्यात जायचे होते. कारऐवजी त्याने मेट्रोने जाणे पसंद केले. तो उपचार घेऊन घरी परतला तेव्हा तो खूप प्रभावित झाला होता. त्याने मेट्रो खूप जलद, सोयीस्कर आणि उपयुक्त असल्याचे म्हटले. आपल्या ट्विटमध्ये बच्चन यांनी मेट्रोची उपयुक्तता सांगून तेवढ्यावरच थांबले नव्हते. त्यांनी मेट्रोचा, प्रदुषणाचा आणि झाडांचाही संबंध जोडला. ते म्हणाले, प्रदूषणावर उपाय म्हणजे अधिक झाडे लावा. मी आमच्या घराच्या बागेत झाडे लावली आहेत, तुम्ही लावलीत का? यातून बच्चन यांनी अप्रत्यक्षरित्या मेट्रोच्या कामासाठी आरेतील जंगलतोडीलाच पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे.

मुंबई मेट्रो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मेट्रो प्रोजेक्ट प्रमुख अश्विनी यांनी अमिताभ बच्चन यांच्या या भूमिकेनंतर त्यांचे ट्विट रिट्विट करत कौतुक केले आहे. पर्यावरण प्रेमी व मुंबईकर मेट्रोला विरोध करत असताना अमिताभ बच्चन यांचे हे ट्विट मोठे वादग्रस्त ठरत आहे. कारण या मेट्रो कारशेड मुळे मुंबईचे फुफ्फुस असलेले आरे जंगल नष्ट होणार आहे. त्यामुळे इतके चांगले अभिनेते व अभ्यासू असूनदेखील अमिताभ बच्चन यांची ही प्रतिक्रिया अनेकजणांना रूचलेली नाही.

अखिल चित्रे हे यावर अमिताभ बच्चन यांच्या मेट्रो समर्थनाच्या ट्विटला प्रतिक्रिया देत म्हणाले की, मेट्रोला 2010मध्ये विरोध करणारे अमिताभ बच्चन नवीन सरकार आल्यावर मेट्रोला कसे पाठिंबा देत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. एवढी लोके विरोध करत असताना बच्चन यांचे ट्विट हे दुर्दैवी आहे तसेच त्यांनी घरी झाडे लावायला सांगितलेल्या उद्देशावर चित्रे पुढे म्हणाले घराच्या परिसरात झाड लावणे हा निसर्गातील जंगलांना पर्याय होऊ शकत नाही. वास्तव कल्पनेपेक्षा विचित्र असते. यामुळेच बच्चन यांनी मेट्रो विषयी केलेले ट्विट पुढे आणखी काही दिवस वादग्रस्त ठरणार आहे असेच चित्र दिसत आहे.

Leave a Comment