शिवबंधनात अडकणार उर्मिला मातोंडकर?


मुंबई: अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून पक्षाला रामराम ठोकल्यानंतर शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे कळत असल्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार का, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी उर्मिला मातोंडकर यांनी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे समजते. पण उर्मिला यांनी ही चर्चा वैयक्तिक स्वरुपाची असल्याचा दावा केला आहे. पण याबाबत शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला मातोंडकर लवकरच शिवसेनेच प्रवेश करू शकतात.

उर्मिला मातोंडकर यांना लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात अपेक्षित यश मिळाले नसले तरी त्यांचा प्रचार चर्चेचा विषय ठरला होता. उर्मिला मातोंडकर यांचा सुरुवातीला गोपाळ शेट्टी यांच्यापुढे निभाव लागणार नाही, असे म्हटले जात होते. पण, उर्मिला यांची राजकीय जाण अत्यंत प्रगल्भ असल्याचे लक्षात आल्यानंतर उत्तर मुंबईतील प्रचाराला खऱ्या अर्थाने रंगत आली होती. त्यामुळे आता उर्मिला यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दिली जाणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment