काँग्रेसला पुन्हा ‘सोनिया’चे दिवस?


लोकसभा निवडणुकीच्या निकालांपासून काँग्रेस पक्षात एक प्रकारचे नैराश्य आहे. कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये भवितव्य दिसत नाही आणि हा पक्ष जणू अस्तित्वहीन झाला. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनाही असुरक्षितता वाटू लागली आणि हताश होऊन त्यांनी अन्य पक्षांचा आश्रय घेतला. दुसरीकडे राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडून देऊन काँग्रेसला अधांतरी सोडली. या परिस्थितीत राहुल यांच्या मातोश्री व काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. सोनियांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक आणून गळाठलेल्या काँग्रेसला पुन्हा उभे करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पक्ष उभारी घेण्याच्या परिस्थितीत येण्याची आशा निर्माण झाली आहे.

सुमारे एक वर्ष आणि आठ महिन्यांच्या अवधीनंतर काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा सांभाळल्यानंतर सोनिया गांधी यांनी गुरुवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक घेतली. या बैठकीत पक्षाचे सरचिटणीस, प्रभारी, प्रदेश अध्यक्ष आणि विधिमंडळ पक्ष नेत्यांचा समावेश होता. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा, ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खडगे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे यावेळी मुख्यतः उपस्थित होते.

“खूप दिवसानंतर चांगली चर्चा झाली. यामुळे अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. पक्ष पुन्हा योग्य दिशेकडे वळत आहे,” असे उद्गार या बैठकीनंतर एका युवक नेत्याने काढले. त्यातून पक्षात नवे वारे वाहू लागल्याचे दिसून येते. यश नेहमी संघर्षानंतरच मिळते, हा संदेश देण्यात पक्षाध्यक्ष म्हणून देण्यात सोनिया गांधी यशस्वी ठरल्या, हे त्यातून अधोरेखित झाले. आम्ही पुन्हा 2004 सालच्या निवडणुकीच्या आधीच्या वातावरणात गेल्यासारखे वाटले. आमच्या चुकांतून धडा घेऊन आम्ही नवीन रणनीती आखत आहोत, असे मत एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले.ही बैठक सुमारे चार तास चालली. यात सोनियांनी सर्व नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि आपले मतही मांडले.

रस्त्यांवर संघर्ष केल्याशिवाय सत्तेपर्यंत पोचणे अवघड आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तुलनेत आपली विचारसरणी मजबूत करावी लागेल. बूथपासून प्रदेश कार्यकर्त्यांची फौज उभी करावी लागेल, असे त्यांनी उपस्थितांच्या मनावर ठसवले. सोनियांनी ज्या तऱ्हेने आपल्या दुसऱ्या इनिंगची सुरूवात केली, त्यातून पक्ष नेतृत्व व नेते आणि नेते व कार्यकर्त्यांमधील संवाद वाढेल. यामुळे संघटनेला बळ मिळेल आणि नेते व कार्यकर्त्यांचे मनोधौर्य वाढेल, अशी आशा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सोनियांनी बहुधा आपल्या कार्यकर्त्यांना नवा कार्यक्रमही दिला आहे. त्यामुळे देशातील बिघडत्या आर्थिक परिस्थितीच्या विरोधात पक्षाच्या वतीने 15 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशात निदर्शने करण्यात येईल, असे पक्षाचे नेते आर. पी. एन. सिंह यांनी सांगितले. त्याआधी 20 ते 30 सप्टेंबरपर्यंत सर्व प्रदेशांमध्ये या विषयावर संमेलने आयोजित करण्यात येणार आहेत.

सोनिया गांधी यांनी याआधीही काँग्रेसला यशाच्या मार्गावर नेले होते. त्यामुळे काँग्रेसला आपले बरेचसे गमावलेले वैभव परत मिळणे शक्य झाले होते. यूपीएच्या दुसऱ्या कालावधीत, काँग्रेसला दुसऱ्यांदा सरकार बनविण्यासाठी स्वबळावर 206 जागा आणि सहकारी पक्षांसह 262 जागा मिळणे शक्य झाले होते. या सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदी सलग 13 वर्षे राहण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. त्यांची अथक मेहनत ही काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची कारणे होती. त्यांनी 1999 मध्ये सूत्रे हाती घेतली तेव्हाही काँग्रेस अधोगतीच्या मार्गावर होती. त्यावेळी काँग्रेसकडे केवळ 114 जागा होत्या, आता त्याच्या अर्ध्याहून कमी जागा आहेत.

आज काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट आहे. निवडणुकीतील पराभवानंतर सामान्य काँग्रेस कार्यकर्ता मलूल झाला आहे. त्या कार्यकर्त्याला पुन्हा भक्कमपणे उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याची गरज आहे. एकीकडे भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवत आहे आणि सत्तेत असूनही कार्यकर्त्यांना वेगवेगळे कार्यक्रम देत आहे. त्या तुलनेच काँग्रेसमध्ये बऱ्यापैकी शांतता आहे. सत्ताधाऱ्यांविरूद्ध आवाज उठवणारे कार्यकर्ते ही काँग्रेसची तातडीची गरज आहे. उलट महाराष्ट्रासारख्या राज्यात अख्खा काँग्रेस पक्ष भाजपमध्ये जाताना दिसत आहे. हे आव्हान काँग्रेसला पेलायचे आहे. आता सोनिया पुन्हा 1999-2004 या काळातील करिष्मा दाखवतात का आणि काँग्रेसला सोनियाचे दिवस दाखवतात का, ही खरी उत्सुकता आहे.

Leave a Comment