चीनशी संग, ऑस्ट्रेलियाच्या प्राणाशी गाठ


महासत्ता होऊ पाहणाऱ्या चीनच्या कारवायांचा धसका बहुतेक सर्व देशांनी घेतला आहे. मात्र तरीही चीनशी मैत्रीचे संबंध असलेले काही देश आहेत. ऑस्ट्रेलिया हा असाच एक देश. भौगोलिकदृष्ट्या जवळ असलेल्या चीनशी या देशाने मैत्री वाढवली आणि आता त्याचाच फटका या देशाला बसला आहे. त्यामुळे चीनशी किती जवळीक करावी, याचा पुनर्विचार ऑस्ट्रेलियाला करावा लागणार आहे.

ऑस्ट्रेलियात मे महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी देशाच्या संसदेवर आणि तीन मोठ्या राजकीय पक्षांवर झालेल्या सायबर हल्ल्यामागे चीनचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुप्तचर संस्थांनी हा निष्कर्ष काढला आहे.

ही कहाणी सुरू झाली फेब्रुवारी महिन्यात. त्यावेळी हॅकर्सनी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संसदेच्या नेटवर्कचा भंग केल्याचे सरकारने जाहीर केले होते. हा हल्ला अत्यंत अत्याधुनिक होता आणि बहुधा एखाद्या परकीय सरकारने केला असावा, असे मॉरिसन त्यावेळी म्हणाले होते. मात्र कोणत्याही सरकारचा सहभाग असल्याचा संशय त्यांनी त्यावेळी व्यक्त केला नव्हता. या हल्ल्याचा शोध लागला तेव्हा सर्व ऑस्ट्रेलियन खासदार आणि त्यांच्या कर्मचार्यांेना संसदेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटिटिव्ह्ज आणि सिनेटच्या अध्यक्षांनी तातडीने त्यांचे पासवर्ड बदलण्यास सांगितले होते. ऑस्ट्रेलियन सिग्नल्स डायरेक्टोरेट (एएसडी) ही ऑस्ट्रेलियाची सायबर गुप्तचर यंत्रणा. या संस्थेने मार्च महिन्यात असा निष्कर्ष काढला होता, की या हल्ल्यासाठी चीनचे अंतर्गत सुरक्षा मंत्रालय जबाबदार आहे.

त्यावेळी एएसडीने या प्रकरणाचा तपास केला होता आणि हॅकर्सनी सत्ताधारी लिबरल पक्ष, त्याचा सहकारी पक्ष नॅशनल पार्टी आणि विरोधी पक्ष लेबर पार्टी यांच्या नेटवर्कमध्येही प्रवेश केल्याचे एएसडीला आढळले होते. जे तंत्र आणि कोड चिनी हॅकर वापरत असल्याचे यापूर्वी आढळले होते, तेच तंत्र व कोड याही हल्ल्यात वापरल्याचे तपास अधिकाऱ्यांना आढळले. इतकेच नाही तर ऑस्ट्रेलियातील राजकीय पक्ष हे चिनी हेरगिरीच्या निशाण्यावर असल्याचेही अधिकाऱ्यांना आढळले.

विशेष म्हणजे हा हल्ला झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या निवडणुकीला केवळ तीन महिने उरले होते. तसेच अमेरिकेतील 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीतही हॅकरचा हस्तक्षेप झाल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात करण्यात येत होता. त्यामुळे या हल्ल्याबाबत मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात आली होती. मात्र हॅकर्सनी गोळी केलेली माहिती कोणत्याही प्रकारे वापरल्याचे संकेत मिळालेले नाहीत, असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मॉरिसन आणि त्यांच्या लिबरल-नॅशनल पार्टी युतीने सर्वांच्या अपेक्षा मोडीत काढत ही निवडणूक जिंकली. मॉरिसन यांनी या निकालांचे वर्णन चमत्कार असे केले होते.

गुप्तचर संस्थांच्या या अहवालात ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडूनही काही माहिती मागवून समाविष्ट करण्यात आली आहे. चीनशी व्यापारी संबंब बिघडू येऊ नये म्हणून हे निष्कर्ष गुप्त ठेवण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. या हल्ल्यामागे असल्याचा संशय आहे किंवा या अहवालातील तपशीलांबाबत ऑस्ट्रेलियन सरकारने अद्याप काहीही भाष्य केलेले नाही. या प्रकरणाची थेट माहिती असलेल्या पाच जणांनी ही माहिती दिल्याचे रॉयटर्स वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

रॉयटर्सने या संदर्भात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या कार्यालयाकडेही विचारणा केली होती. मात्र या कार्यालयाने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. एएसडीनेही यावर भाष्य करण्यास नकार दिला. चीनने मात्र या हल्ल्यामागे आपला हात असल्याचे नाकारले आहे. इंटरनेट हे शोध लावण्यासाठी अवघड असलेल्या सिद्धांतांनी भरलेले आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या राजकारणात आणि एकूणच समाजात चीनचा प्रभाव वाढत चालला आहे आणि त्याला ऑस्ट्रेलियाने अलीकडच्या काही वर्षांत खीळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. या धोरणामुळे चीनशी असलेल्या व्यापारावर परिणाम झाला आहे. उदाहरणार्थ, 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाने परदेशातून येणाऱ्या राजकीय देणग्यांवर बंदी घातली आहे. त्यानंतर एक वर्षाने एएसडीने ऑस्ट्रेलियाच्या नवीन 5 जी तंत्रज्ञानाच्या जोखमीचे मूल्यमापन केले. त्यातून हुआवाई या या चिनी टेलिकॉम कंपनीला नवीन 5 जी नेटवर्कवरून जवळजवळ हद्दपार करण्यात आले.

अमेरिकेच्या काही अधिकारी आणि मुत्सद्द्यांनी ऑस्ट्रेलियाच्या अशा पावलांचे स्वागत केले आहे. मात्र अन्य देशांनी ऑस्ट्रेलियाने चीनला अधिक जाहीरपणे विरोध न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या महिन्यात सिडनीच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी ऑस्ट्रेलियाच्या या धोरणावर कडाडून टीका केली. एखादा देश व्यापार आणि आर्थिक विषयांना राष्ट्रीय सुरक्षेपासून वेगळे करू शकत नाही, असे पॉम्पिओ म्हणाले होते.

ऑस्ट्रेलिया हा चीनचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. ऑस्ट्रेलियन लोह खनिज, कोळसा आणि शेतीमालाच्या वस्तूंची खरेदी प्रामुख्याने चीनच करतो. देशाच्या एकूण निर्यातीपैकी एक तृतीयांश निर्यात चीनमध्ये होते आणि दरवर्षी दहा लाखांहून अधिक पर्यटक आणि विद्यार्थी ऑस्ट्रेलियातून चीनला जातात. या हल्ल्याबाबत चीनने जाहीरपणे आरोप केले तर ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेला पोहचण्याची खरोखरच मोठी शक्यता आहे, अशी भीती ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांना वाटते. असंगाशी संग प्राणाशी गाठ अशी आपल्याकडे म्हण आहे. चीनसारख्य बेभरवशाच्या देशाशी मैत्री वाढवून ऑस्ट्रेलियाला आता त्याचाच प्रत्यय येत आहे.

Leave a Comment