अखेर सत्याला वाचा फुटली!


अमेरिकेच्या मदतीनेच पाकिस्तानने जिहादी दहतवाद्यांना प्रशिक्षण दिले, अशी धक्कादायक कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी दिली आहे. यामुळे गेली सहा-सात दशके सर्वांना माहीत असलेले गुपित नव्याने सर्वांना माहीत झाले आहे. पाकिस्तानचे अंतरंगही त्यामुळे उघड झाले आहे.

अमेरिका व रशियातील शीतयुद्धाच्या काळात अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत संघाविरोधात लढण्यासाठी पाकिस्ताननेच जिहादी दहशतवादी तयार केले. पाकिस्ताननेच त्यांना प्रशिक्षण दिले आणि त्यासाठी अमेरिकेनेच पैसा पुरवला, असे ‘रशिया टुडे’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी सांगितले. मात्र, अफगाणिस्तानमधील दहशतवाद संपविण्यासाठी अमेरिकेला केलेली मदत ही पाकिस्तानची मोठी चूक असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अफगाणिस्तानमधून दहशतवादाचे उच्चाटन करण्यास अमेरिकेला अपयश आले. मात्र अमेरिकेने त्याचे खापर पाकिस्तानवर फोडले. हे योग्य नाही, असे खान यांनी म्हटले आहे.

या कारणामुळे पाकिस्तानातील 70000 लोकांचा जीव गेला. हीच मदत आमच्यासाठी नुकसानकारक ठरली. आम्हाला 100 अब्ज डॉलरचे नुकसान झाले, असे इम्रान म्हणाले. अशाच प्रकारे जुलै महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असताना इम्रान खान यांनी आपल्या देशात आजही 30,000 ते 40,000 दहशतवादी उपस्थित असल्याचे मान्य केले होते. या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तान आणि काश्मिरमध्ये प्रशिक्षण देण्यात आल्याचेही त्यांनी मान्य केले होते.

असाच एक गौप्यस्फोट पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहाराचे मंत्री ब्रिगेडियर (आर) एजाज अहमद शाह यांनीही नुकताच असा एक गौप्यस्फोट केला होता. जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानने कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे सांगून या दहशतवादी संघटनेला मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न इम्रान सरकार करत असल्याचे ते म्हणाले होते.

इम्रान खान किंवा त्यांच्या मंत्र्यांनी केलेले हे गौप्यस्फोट सनसनाटी म्हणता येणार नाहीत. कारण पाकिस्तानातील जेहादी दहशतवादाचा खरा पोषणकर्ता अमेरिकाच आहे, हे सगळ्या जगाला माहीत आहे. अफगाणिस्तानात 1980 च्या काळात तत्कालीन सोव्हिएत संघाच्या फौजा घुसल्या होत्या. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानने जिहाद्यांना तयार केले होते. त्याचीच कबुली आता इम्रान देत आहेत. “या मुजाहिदीनांना जिहादसाठी तयार करण्यात आले. यासाठी अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने निधी पुरवठा केला होता. तरीही आज तीच अमेरिका पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप करत आहे,” अशी व्यथा इम्रान यांनी बोलून दाखवली आहे.

तालिबान नावाचा राक्षस 2001 मध्ये अमेरिकेवर उलटला असला तरी हा भस्मासूर अमेरिकेनेच पोसला हे वास्तव आहे. म्हणूनच तर अफगाणिस्तानातून सैन्य परत घेण्याची वेळ आली तेव्हा अमेरिकेने तालिबानशी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू केले. अमेरिकेला तालिबानशी चर्चेकरिता तयार करण्यासाठी पाकिस्तानने गुड तालिबान- बॅड तालिबान हीच भाषा वापरली होती. मात्र दहशतवाद हा दहशतवादच असतो. म्हणूनच मुजाहिदी संघटना निर्माण करून रशियाला हरवण्याचा अमेरिकेचा डाव यशस्वी झाला आणि अफगाणिस्तानातून रशियाने काढता पाय घेतला. सोव्हिएत सैन्य निघून गेल्यावर अमेरिकेने अफगाणिस्तानला वाऱ्यावर सोडले. त्याचा फायदा पाकिस्तानने उचलला आणि तालिबानची सैतानी राजवट आणली. याच राजवटीने इस्लामिक दहशतवादाला जन्म दिला. सोव्हिएत फौजांना घालवून दिल्यानंतर जेहादी दहशतवाद्यांची हिंमत वाढली आणि त्यांनी थेट अमेरिकेला आव्हान द्यायला सुरूवात केली.

यासाठी या जेहाद्यांना पाठबळ पुरवले ते पाकिस्तानने. एकीकडे अमेरिकेकडे मखलाशी करून आणि रशियाचे भय दाखवून पाकिस्तानने या दहशतवाद्यांना पोसले. परंतु ओसामा बिन लादेनला पाकिस्तानने आश्रय देऊन महाचूक केली. लादेनचा खात्मा केल्यावर अमेरिकेचा पाकिस्तानवरील विश्वास उडाला. त्यातच अमेरिकेने ही कारवाई करताना पाकिस्तानला खिजगणतीतही धरले नाही. याचा परिणाम पाकिस्तान व अमेरिका यांच्या संबंधात दुरावा निर्माण होण्यात झाली. शिवाय अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून त्यांनी दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणला आहे.

हा सर्व दबाव आणि अमेरिकेची नाराजी असह्य होऊनच इम्रान यांना कंठ फुटला आहे. अमेरिकेची सगळी कुलंगडी बाहेर काढण्याचे कारण हेच असू शकते. अन्यथा इतक्या जुन्या गोष्टी उकरून काढायचे कारण काय? मात्र कुठल्याही कारणाने का होईना, पण सत्याला वाचा फुटत असेल तर हवेच आहे!

Leave a Comment