थंडीच्या मोसमातील वाराणसीची ‘गोड’ खासियत – ‘मलैय्यो’

malaiyo
ज्याप्रमाणे काही ठराविक पदार्थ त्या त्या ठिकाणाची खासियत असतात, त्याचप्रमाणे काही खास पदार्थ हे केवळ त्या ठिकाणी केवळ ठराविक मोसमातच मिळतात. कच्च्या, म्हणजेच न उकळलेल्या दुधामध्ये वेलदोड्याची पूड घालून, दुध घुसळून तयार केला जाणारे अतिशय मऊसूत, आईस्क्रीमसारखे मिष्टान्न ‘मलैय्यो’, हे वाराणसीची खासियत असून, हा पदार्थ येथे केवळ थंडीच्या मोसमातच पहावयास मिळतो. हे मिष्टान्न वाराणसी येथे मिळणाऱ्या खास पदार्थांपैकी एक आहे. मातीच्या वाडग्यमध्ये मलैय्यो घालून, त्यावर घातलेल्या बदाम पिस्त्यांच्या तुकड्यांनी या पदार्थाची लज्जत आणखीनच वाढते.
malaiyo1
कच्चे दुध घुसळून त्यावर येणाऱ्या फेसामध्ये वेलदोड्याची पूड घालून मलैय्यो तयार केले जाते. छोट्याश्या मातीच्या वाडग्यामध्ये दिलेले मलैय्यो संपविल्यावर ज्या भांड्यामध्ये मलैय्यो बनविले जाते, त्याच्या तळाशी साठलेले पळीभर दुधही प्यायला दिले जाते. या दुधाला केशर, साखर आणि वेलदोड्याच्या वापराने अतिशय सुंदर चव आलेली असते. मलैय्यो हा पदार्थ उष्ण हवामानामध्ये लवकर खराब होणारा असल्याने हा पदार्थ बहुधा थंडीच्या मोसामामधेच बनविला जात असतो.
malaiyo2
थंडीच्या दिवसांमध्ये बनविले गेलेले मलैय्यो उन्हे डोक्यावर यायच्या आताच विकून संपवावे लागते, कारण त्यानंतर थोडी जरी उष्णता वाढली, तरी हा पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. मलैय्यो तयार करून विकणाऱ्या प्रत्येक दुकानदाराची, मलैय्यो तयार करण्याची पद्धत वेगवेगळी असून, ही पद्धत त्या त्या दुकानांमध्ये वंशपरंपरेने चालत आली आहे. कोणताही दुकानदार, आपली मलैय्यो बनविण्याची पद्धत कधीच उघड करीत नाही. मलैय्यो हे मिष्टान्न लखनऊ किंवा दिल्ली सारख्या शहरांमध्येही उपलब्ध असले, तरी हा पदार्थ वाराणसी येथील खासियत आहे, त्यामुळे थंडीच्या मोसमामध्ये कधी वाराणसीला जाणे झालेच तर हा पदार्थ चाखून पाहण्यास विसरू नये.

Leave a Comment