राणी एलिझाबेथची सगळ्यात धाकटी नात- लेडी लुईज विंडसर

Louise-Windsor
ब्रिटीश राजघराण्याच्या आताच्या पिढीमध्ये प्रिन्स विलियम आणि प्रिन्स हॅरी ही अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्वे आहेत. हे दोघेही राणी एलिझाबेथचे नातू आहेत. पण या नातवंडांच्या शिवाय राणी एलिझाबेथची नात लेडी लुईज विंडसर ही देखील आता राजपरिवारातील लोकप्रिय सदस्यांच्या यादीमध्ये समाविष्ट होत आहे. लेडी लुईज विंडसर चौदा वर्षांची असून, ही राणी एलिझाबेथचे सर्वात धाकटे पुत्र प्रिन्स एडवर्ड आणि त्यांची पत्नी सोफी या दाम्पत्याची थोरली कन्या आहे. या दाम्पत्याला एक मुलगाही असून, त्याचे नाव जेम्स आहे.
Louise-Windsor1
या पूर्वीच्या काळामध्ये लेडी लुईज वयाने लहान असल्यामुळे ती फारशी प्रसिद्धीच्या झोतामध्ये नसे. पण आता वयात आल्यानंतर लेडी लुईज अनेक पारिवारिक आणि सामाजिक कार्यक्रमांना आपल्या आईच्या सोबत दिसू लागल्याने तिच्याकडे लोकांचे लक्ष वळले आहे. लेडी लुइजचा जन्म सप्टेंबर २००३ साली झाला. तिचा जन्म वेळेच्या आधीच झाल्याने (premature birth) जन्मतःच लुईजला दृष्टीदोष असल्याचे निष्पन्न झाले. लुईज अवघी दीड वर्षाची असताना दृष्टीदोष सुधारण्यासाठी तिच्यावर शस्त्रकीया करण्यात आली, मात्र ही शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली. त्यानंतर २०१४ साली लुइजच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात येऊन आता तिचा दृष्टीदोष पूर्णपणे नाहीसा झाला आहे.
Louise-Windsor2
लेडी लुईज घोडदौडीमध्ये पारंगत असून, ‘हॉर्स कॅरेज ड्रायव्हिंग’मध्ये ही निष्णात आहे. विंडसर हॉर्स शोअधे लेडी लुईजच्या या कौशल्याचे भरपूर कौतुक तिच्या आजी-आजोबांनी, म्हणजेच राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलीप यांनी केले. लुईज लहानपणापासूनच प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहिली असल्याने, आपली आजी इंग्लंडची राणी असल्याचे तिला ठाऊकच नव्हते. तिच्यानुसार राणी एलिझाबेथही केवळ तिची आणि तिच्या भावंडांची लाडकी ‘आजी’ होती. मात्र शाळेत जाऊ लागल्यानंतर आपण इतरांच्या पेक्षा वेगळे आहोत आणि आपली आजी कोणीतरी फारच महत्वाची व्यक्ती असल्याची जाणीव तिला होऊ लागली. त्यानंतर मात्र आपली आजी इंग्लंडची राणी आहे हे कळल्यानंतर तिला मोठा धक्का बसला असल्याचे तिची आई काऊंटेस सोफी म्हणतात.

Leave a Comment