राजस्थानमधील अहार येथील विस्मृतीत गेलेली समाधीस्थळे

ahar
राजस्थान राज्यातील उदयपूर हे शहर तेथील अनेक सुंदर तलावांसाठी प्रसिद्ध असल्याने या शहराला ‘सिटी ऑफ लेक्स’ या नावाने देखील ओळखले जाते. येथे असणारा सिटी पॅलेस आणि जय महाल या दोन ऐतिहासिक वास्तू, तसेच रणकपूर आणि चित्तोड सारख्या ठिकाणांच्या जवळ हे शहर वसलेले असल्याने येथे दर वर्षी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. उदयपुर आणि त्याच्या आसपासची ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध असली, तरी उदयपूर शहराच्या जवळच असलेली अहार येथील ऐतिहासिक समाधीस्थळे मात्र काहीशी विस्मृतीत गेली आहेत.
ahar1
उदयपुर येथील ‘ओल्ड सिटी’ च्या परिसरापासून ही समाधीस्थळे केवळ दोन किलोमीटरच्या अंतरावर आहेत. या ठिकाणी वास्तुकलेचे उत्तम उदाहरण असलेली तब्बल ३७२ लहान मोठी समाधीस्थळे आहेत. मेवाडच्या राजघराण्यातील वंशजांची ही समाधीस्थळे आहेत. ‘महासत्याजी’ या नावाने देखील ही समाधीस्थळे ओळखली जातात. या ठिकाणी मेवाड राजवंशाच्या अनेक वंशजांच्या समाधी असून त्या ठिकाणी संगमरवरी ‘छत्र्या’ पहावयास मिळतात. या सर्व समाधी सुमारे चारशे वर्षांहूनही अधिक प्राचीन आहेत. त्यातील काही समाधी एकोणीस राजांच्या असून, त्यांच्या मृत्यूनन्तर सती गेलेल्या राणीवश्याच्या देखील समाधी या ठिकाणी पहावयास मिळतात.
ahar2
मेवाडचे प्रथम राजे राणा अमर सिंह यांचा मृत्यू उदयपुरमधेच झाला असून, त्यांची समाधी देखील याच ठिकाणी आहे. त्यांच्या भव्य समाधीचे निर्माण त्यांचे पुत्र राणा करण सिंह यांनी करविले. राणा अमर सिंह यांच्या समाधीच्या मधोमध चार मुखे असलेली मूर्ती असून, त्यांच्या मृत्युनंतर सती गेलेल्या राण्यांना ही मूर्ती समर्पित आहे. राणा अमर सिंह यांच्या प्रमाणेच राणा संग्राम सिंह यांची समाधी देखील भव्य आहे. राणा संग्राम सिंह यांच्या मृत्युनंतर यांच्या एकवीस राण्याही त्यांच्याबरोबर सती गेल्या.
ahar3
अहार समाधीस्थळे एकूण तीन एकर परिसरामध्ये विस्तारलेली असून, भारतातील सर्वात मोठ्या समाधीस्थळांपैकी एक आहेत. या ठिकाणी ‘गंगोद्भव’ नामक पाण्याचे कुंड असून, मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर या कुंडामध्ये सर्व जण स्नान करीत असत. काळाच्या ओघामध्ये हे ठिकाण आता काहीसे विस्मृतीत गेले आहे. या ठिकाणाची फारशी निगा न राखली गेल्याने अनेक समाधी मोडकळीला आल्या आहेत. मात्र आता ‘महाराणा ऑफ मेवाड चॅरिटेबल फाउंडेशन’ च्या वतीने या ठिकाणी पुनर्संचयाचे (restoration) काम हाती घेण्यात आले असून, त्या अंतर्गत राणा अमर सिंह आणि राणा संग्राम सिंह यांच्या समाधी पुनर्संचयित करण्यात येत आहेत.

Leave a Comment